
फलटण : जिल्हापरिषद व पंचायत समिती गण निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तालुक्यात नेहमीच गटातटाचे राजकारण राहिले आहे, त्यामुळे येथे वरकरणी जरी शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशा लढतीचे चित्र दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र राजेगट विरुद्ध खासदार गट असाच राजकीय सामना रंगणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून गटातटाच्या राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या या तालुक्यात यंदा जातीय समीकरणे देखील निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे होणारी निवडणुकी ही केवळ सत्तेसाठी नव्हे तर राजकीय वर्चस्व आणि अस्तित्व टिकविण्यासाठी ची लढाई ठरणार आहे.
विधानसभेपासून ते नगरपरिषदेच्या निवडणुकीत सत्तेचा सोपान चढता राहिल्याने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती पंचायत समितीसह तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद गटांवर आपला झेंडा फडकविण्यास सज्ज झाली आहे. फलटण तालुक्याच्या राजकारणावर गेल्या ३५ वर्षांपासून आमदार रामराजे नाईक निंबाळकर, बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राजेगटाची घट्ट पकड व सत्ता होती परंतु गत विधानसभा निवडणुकीपासून या सत्तेला व वर्चस्वाला पराभवाचे फटके बसू लागले आहेत. राजेगटाला बॅकफूटवर ढकलणारी महायुती आता पुन्हा एकदा ३५ वर्षांच्या राजे गटाच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी आक्रमक झाली आहे. त्यामुळे राजे गटासाठी ही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक राजकीय अस्तित्वाची ठरणारी असल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या निवडणुकीत सत्तारूढ शिवसेनेचे बळ मिळाल्याने राजेगट पूर्ण ताकतीने, जिद्दीने व उमेदीने निवडणुकीच्या मैदानात उतरलेला पहावयास मिळत आहे. विधानसभेत व नगरपरिषदेमध्ये जरी राजेगटाला पराभव स्वीकारावा लागला असला तरी त्यांना मिळालेली मते पाहता त्यांचा प्रभाव व राजकीय मतांची ताकद अजूनही प्रभावी असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे भाजप राष्ट्रवादीच्या महायुतीला मागील निवडणुकात मिळालेल्या विजयाच्या उन्मादात न राहता विजयासाठी नियोजनबद्ध पावले टाकावी लागणार आहेत. सध्या महायुतीतील दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय प्रवेशांची लाट आली आहे. या प्रवेशांमुळे लोकप्रतिनिधींनी जरी बेरजेचे राजकारण केले असले तरी सत्तेमध्ये वाटा देत असताना निष्ठावंतांना सांभाळण्याचे प्रमुख आव्हान महायुतीपुढे असणार आहे. निष्ठावंतांना डावलले जाणार नाही अथवा त्यांना दुर्लक्षित न करता सन्मानजनक वागणूक मिळेल असा विश्वास महायुतीला त्यांना द्यावा लागणार आहे. ज्या ज्या ठिकाणी जुने व नवे अशी दुफळी निर्माण होत असेल तर त्या ठिकाणी प्रमुख नेतेमंडळींना स्वतः लक्ष घालून तेथील परिस्थिती नियंत्रणात ठेवावी लागणार आहे. जर जुने व नवे यांचा मेळ बसवून नियोजनपूर्वक प्रचार, प्रसार व डावपेच लढवले गेले तर महायुती या निवडणुकीत विजयाची प्रमुख दावेदार ठरेल. दुसरीकडे सत्ताधारी राजेगटाला विधानसभा व नगरपरिषदेत सत्ता गमवावी लागली आहे. त्याचबरोबर ऐन निवडणुकीच्या तोंडावर गटातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी भाजप व राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राजे गटाला मोठा धक्का सहन करावा लागला आहे. या निवडणुकांमध्ये देखील महायुतीने राजे गटातील महत्त्वाचे कार्यकर्ते आपल्या गळाला लावण्याचे काम यशस्वीपणे सुरू ठेवले आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीतील निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदार यांच्या भरोशावर व ताकतीवर व गट सोडून गेलेल्यांच्या पाठीमागे असलेले जनमत आपल्याकडेच राखून ठेवण्याचे कसब व तारेवरची कसरत राजे गटाला करावी लागणार आहे. पडझडीच्या कालावधीमध्ये देखील ग्रामीण भागामध्ये आजही राजेगटाची ताकद मोठी प्रभावी आहे ही बाब दिलासा देणारी व विजयाच्या अशा कायम ठेवण्यासाठी महत्वाची ठरणार आहे. विधानसभा व नगरपरिषदेतील पराभवानंतर आपले अस्तित्व जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने व भविष्यातील सत्तासमीकरणांसाठी राजे गटासाठी ही निवडणूक निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे फलटण तालुक्यातील राजकीय रणसंग्रामामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून राजेगट आपले अस्तित्व राखणार की महायुती बाजी मारणार याकडे समस्त जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
फलटण तालुका एक दृष्टिक्षेप –
* जिल्हा परिषद गट – ८
* पंचायत समिती गण – १६
मतदार संख्या –
पु. – १२९७४६
स्त्री – १२३४७२
इतर – ०९
एकूण मतदार – २,५३,२२७
