गणेशोत्सवात टपाल विभागाची ‘जनसेवा’; आरोग्य, टपाल सुविधा अन् पोलिसांसाठी विश्रांतीची सोय

फलटण : पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवात भारतीय टपाल विभागाने यंदाही ‘डाक सेवा, जन सेवा’ या मूलमंत्रानुसार विविध लोकोपयोगी आणि सामाजिक उपक्रम राबविले आहेत. गणेशभक्त व नागरिकांसाठी वैद्यकीय सेवा, विशेष टपाल सुविधा तसेच गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात कार्यरत असलेल्या पुणे शहर पोलिसांसाठी विश्रांती व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे आयोजित मोफत वैद्यकीय शिबिरासाठी पुणे सिटी पोस्ट ऑफिसच्या परिसरातील सुमारे ५०० चौरस फूट जागा टपाल विभागाने उपलब्ध करून दिली आहे. या वैद्यकीय सेवेचे उद्घाटन रविवारी (१३ सप्टेंबर) पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्र, श्रीमती प्रीती अग्रवाल यांच्या हस्ते झाले.
या वेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष सुनील रासने, खजिनदार महेश सूर्यवंशी, प्रवर अधीक्षक नितीन येवला, प्रवर डाकपाल विलास घुले यांच्यासह टपाल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रात्रीही मिळणार टपाल सेवा
गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांच्या सोयीसाठी पुणे शहर प्रधान डाकघर येथे विशेष ‘नाईट कॅम्प पोस्ट ऑफिस’ सुरू करण्यात येणार आहे. ही सुविधा १५ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ७.३० ते रात्री ११.३० या वेळेत सुरू राहणार आहे.
या विशेष टपाल कार्यालयात टपाल विभागाच्या विविध बचत योजना, पोस्टल लाईफ इन्शुरन्स (PLI), ‘माय स्टॅम्प’, आधार कार्डशी संबंधित सेवा तसेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या (IPPB) विमा आणि अन्य सुविधांचा नागरिकांना लाभ घेता येणार आहे.
पोलिसांसाठी प्रधान डाकघराचे प्रांगण खुले
गणेशोत्सवाच्या काळात दिवस-रात्र कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीही टपाल विभागाने विशेष व्यवस्था केली आहे. संपूर्ण गणेशोत्सव कालावधीत पुणे शहर प्रधान डाकघराचे प्रांगण, आरामगृह आणि स्वच्छतागृहांची सुविधा पोलिसांच्या विश्रांती व भोजनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
‘नागरिकांनी सुविधांचा लाभ घ्यावा’
“गणेशोत्सवाच्या या पावन काळात नागरिकांना आणि भाविकांना आवश्यक वैद्यकीय सेवा व टपाल सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, हाच टपाल विभागाचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी या सर्व सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,” असे आवाहन पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्र, श्रीमती प्रीती अग्रवाल यांनी केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने टपाल विभागाला जनसेवेची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विभागाच्या वतीने ट्रस्टचे आभार मानण्यात आले. या सामाजिक उपक्रमांच्या यशस्वी आयोजनाबद्दल श्रीमती प्रीती अग्रवाल आणि निदेशक अभिजित बनसोडे यांनी पुणे शहर प्रधान डाकघर तसेच पुणे शहर पश्चिम विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!