
फलटण : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) अशी सुमारे २,५०० किलोमीटरची रथयात्रा व सायकल वारी यंदा २१ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रवासात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भागवत धर्म प्रसारक मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी केले आहे.
भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार कमेटी, घुमाण तसेच समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशी ते मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी या कालावधीत संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन केले जाते. यंदा या उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे.
महाराष्ट्रातून सुरू होणारी ही वारी गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांतून मार्गक्रमण करणार आहे. सुमारे ५० मोठ्या शहरांसह ५०० हून अधिक ग्रामीण गावांमधून जाणाऱ्या या वारीच्या माध्यमातून सहभागी यात्रेकरूंना विविध राज्यांतील आध्यात्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांसह निसर्गरम्य परिसराचा अनुभव घेता येणार आहे.
संत नामदेव महाराजांनी दिलेल्या शांती, समता आणि बंधुतेच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे, हा या सायकल वारीचा प्रमुख उद्देश आहे. सायकलच्या माध्यमातून प्रदूषणमुक्त प्रवासाचा संदेश देत संतविचार जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.
सहभागींसाठी मोफत सुविधा
या सायकल वारीत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. सायकल यात्रेकरूंना आयोजकांच्या वतीने दोन टी-शर्ट, दररोज चहा, नाश्ता, भोजन तसेच निवासाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे संत नामदेव महाराजांच्या विचारांशी नाते असणाऱ्या भाविकांनी या अनोख्या वारीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
इच्छुकांनी ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी भागवत धर्म प्रसारक मंडळ, सुमित्रा प्लाझा, वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे संपर्क साधून नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी ९८२२०२३५६४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

