SC प्रवर्गातील प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज १५ सप्टेंबरपर्यंत निकाली काढा; विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित ठेवणाऱ्या महाविद्यालयांना प्रशासनाचा इशारा

फलटण : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच मॅट्रिकोत्तर शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशिप) योजनेंतर्गत अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील शैक्षणिक वर्ष २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ मधील प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. यासाठी महाडीबीटी १.० पोर्टल १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत कार्यान्वित ठेवण्यात आले आहे.
विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या शिष्यवृत्ती अर्जांची तातडीने छाननी करून कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. त्रुटींमुळे परत (Reverted) आलेल्या अर्जांबाबत महाविद्यालयांनी संबंधित विद्यार्थ्यांशी तातडीने संपर्क साधून पुढील दोन दिवसांत त्रुटींची पूर्तता करून परिपूर्ण अर्ज प्राप्त करून घ्यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
महाविद्यालयांनी त्यांच्या लॉगिनमध्ये वर्ष व योजनानिहाय प्रलंबित असलेले सर्व अर्ज, तसेच पहिला व दुसरा हप्ता यासंबंधीचे अर्ज तपासून आवश्यक त्रुटींची पूर्तता करावी. त्यानंतर पात्र अर्ज महाडीबीटी प्रणाली १.० द्वारे जिल्हास्तरीय मंजुरीसाठी तातडीने ऑनलाइन अग्रेषित (Forward) करावेत. अपात्र अर्ज स्पष्ट कारण नमूद करून महाविद्यालय स्तरावरूनच नामंजूर (Reject) करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थी, शैक्षणिक वर्ष (२०१८-१९ ते २०२५-२६) आणि अभ्यासक्रमनिहाय डेटा त्यांच्या लॉगिनवरून डाउनलोड करून गुगलशीटमध्ये जतन करून ठेवावा, असेही सांगण्यात आले आहे. विहित मुदतीत कार्यवाही न झाल्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थी, महाविद्यालय किंवा संस्थेची राहील, असा इशारा समाज कल्याण विभागाने दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व संबंधित विद्यार्थी व महाविद्यालयांनी दि. १४ सप्टेंबर २०२६ पर्यंत त्यांच्या स्तरावरील प्रलंबित अर्जांमधील त्रुटी पूर्ण करून अर्ज जिल्हास्तरीय मंजुरीसाठी महाडीबीटी प्रणाली १.० द्वारे तातडीने अग्रेषित करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुनील जाधव यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!