विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पालक-शिक्षकांनी बळ द्यावे ; अपयशातून शिकून पुढे जा : जिल्हाधिकारी संतोष पाटील

फलटण : जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘कॉफी विथ कलेक्टर’ या विशेष उपक्रमात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या करिअरविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, पालकांनी त्यांच्या स्वप्नांना पाठिंबा द्यावा आणि शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, जिल्हा क्रीडा अधिकारी संगीता जगताप, मार्गदर्शक शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजचे विद्यार्थी अत्यंत हुशार आणि महत्त्वाकांक्षी आहेत. त्यांनी करिअरचे ध्येय निश्चित केले असून त्यांच्या स्वप्नांना पालक व शिक्षकांनी योग्य दिशा द्यावी. यश किंवा अपयश हे अंतिम नसते. अपयश आले तरी त्यातून शिकून नव्या जोमाने पुन्हा उभे राहणे हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे असे सांगून स्पर्धा परीक्षांबाबत बोलताना जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, यूपीएससी किंवा एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे तुलनेने सोपे असून अभ्यासाची सुरुवात उशिरा झाली तरी यश मिळवता येते, मात्र क्रीडा क्षेत्रात दीर्घकाळ सातत्य राखून पदक मिळविणे अधिक कठीण असते. क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी चिकाटीने मेहनत घ्यावी. शालेय क्रीडा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण द्यावे, तसेच पालकांनीही खेळाडू विद्यार्थ्यांना भक्कम पाठिंबा द्यावा व आपल्या पाल्याला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडविण्यास प्रोत्साहन द्यावे. क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्याबरोबरच शासन आणि प्रशासन विद्यार्थ्यांच्या पाठीशी कायम उभे असेल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी पाटील यांनी प्रत्येक विद्यार्थ्याशी वैयक्तिक संवाद साधून त्यांच्या भविष्यातील ध्येयांविषयी जाणून घेत संबंधित क्षेत्राबाबत मार्गदर्शन केले. जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी संगीता जगताप यांनी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!