
फलटण : हवामानातील बदल, उन्हाळी पावसाने दिलेली ओढ आणि सिंचनाच्या मर्यादित उपलब्धतेमुळे फलटण तालुक्यात खरीप व रब्बी हंगामातील वेगळेपण आता कमी होत असून, यंदाचा खरीप हंगाम पाणी टंचाई व अनिश्चिततेच्या छायेत राहण्याची शक्यता आहे. यावर्षी अद्यापही उन्हाळी पाऊस झाला नसल्याने तालुक्याला परतीच्या मान्सूनवरच मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
गतवर्षी तालुक्यात वार्षिक सरासरीच्या १०२.७ टक्के म्हणजे ४७२.४ मि.मी. पावसाची नोंद झाली असली, तरी तालुक्यात तो सर्वत्र समान प्रमाणात न झाल्याने त्याचा अपेक्षित लाभ मिळाला नाही. यंदा अल निनोच्या पार्श्वभूमीवर सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यातच धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने आश्वासक पावसाशिवाय बागायती भागातही खरीपाची पेरणी करणे धोकादायक ठरणार आहे. पाऊसाची अनिश्चितता व पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचे आवाहन शासनानेही देखील केले आहे.
यंदा तालुक्यातील खरीप पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र १५ हजार ३८७ हेक्टर असले तरी प्रत्यक्षात सुमारे २० हजार १४३ हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. बाजरीचे सर्वसाधारण क्षेत्र १० हजार ८९३ हेक्टर असून ते पूर्ण क्षमतेने लागवडीखाली येण्याची अपेक्षा आहे. दुग्ध व्यवसायाच्या वाढत्या विस्तारामुळे हिरव्या चाऱ्याची गरज वाढल्याने मक्याखालील क्षेत्रही सर्वसाधारण ३,५७२ हेक्टरवरून सुमारे ७,२५० हेक्टरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ८०० हेक्टर असून यंदाही तेवढ्याच किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे. मात्र घरच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासून आणि बीजप्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तूर, मूग, उडीद, घेवडा, भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांच्या क्षेत्रात फारसा बदल अपेक्षित नसला, तरी कापूस लागवडीत मात्र लक्षणीय वाढ होत आहे. आसू, गोखळी, गुणवरे, निंबळक, बरड तसेच चौधरवाडी आणि जिंती परिसरात कापसाखालील क्षेत्र वाढत असून सर्वसाधारण ६०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, तालुक्यात फळबाग क्षेत्राचाही सातत्याने विस्तार होत आहे. शासनाच्या विशेष योजनेअंतर्गत गिरवी, धुमाळवाडी, बोडकेवाडी, सासकल आणि निरगुडी येथील ४८९ शेतकऱ्यांच्या फळबागांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित सेन्सर बसविण्यात आले आहेत. या तंत्रज्ञानामुळे कीड-रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि हवामानाच्या पूर्वसूचना थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होत आहेत. गेल्या दोन वर्षांत विविध योजनांमधून तालुक्यात सुमारे ४७९.७४ हेक्टर क्षेत्रावर नवीन फळबागांची लागवड झाली आहे. सध्या डाळिंब ९१० हेक्टर, पेरू ३६७ हेक्टर, सीताफळ २८५ हेक्टर आणि आंबा २४२ हेक्टर क्षेत्रावर असून विशेषतः डाळिंब आणि पेरू लागवडीत वाढ होत आहे. यंदा प्रत्येक सहाय्यक कृषी अधिकाऱ्याने किमान पाच हेक्टर नवीन फळबाग क्षेत्र वाढविण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने निश्चित केले आहे.
(बातमी मधील AI फोटो प्रतिकात्मक)

