
फलटण : क्षयरोगाबाबत जनजागृती व्हावी आणि नागरिकांनी वेळेवर तपासणी व उपचार घ्यावेत, या उद्देशाने श्री छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गिरवी (ता. फलटण) येथील राष्ट्रीय छात्र सेना (NCC)च्या विद्यार्थिनींनी ‘क्षयरोगमुक्त भारत’ अभियानांतर्गत प्रभावी जनजागृती कार्यक्रम राबविला.
गिरवी येथील बाजार पटांगणावर विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर करून क्षयरोगाची कारणे, प्रमुख लक्षणे, आजाराचा प्रसार आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती नागरिकांना दिली. ‘क्षयरोगाला घाबरू नका, वेळेवर उपचार घ्या’ असा प्रभावी संदेश पथनाट्यातून देण्यात आला.
पथनाट्यानंतर विद्यार्थिनींनी संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढली. विविध घोषवाक्यांच्या माध्यमातून क्षयरोगमुक्त भारताचा संदेश देत नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्यात आली.
या उपक्रमास एनसीसी प्रमुख मोहन बागुल सर व डॉ. राहूल इंगळे सर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या पथनाट्याचे उपस्थित ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले. विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत सुतार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थिनींच्या प्रभावी सादरीकरणामुळे क्षयरोगाविषयी जनजागृती करण्याचा उपक्रम गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.

