गणेशोत्सवाचा वारसा डिजिटल माध्यमातून जगभर पोहोचणार; जिल्ह्यातील गणेश मंडळे व नागरिकांनी Bappa.org वर छायाचित्रे, व्हिडिओ अपलोड करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

फलटण : महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेल्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, गणेशोत्सव जागतिक पातळीवर पोहोचविण्यासह युनेस्कोच्या वारसा दर्जासाठी दावा करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील गणेशोत्सवाची कला, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक सहभाग डिजिटल माध्यमातून जतन करून जगभर पोहोचविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
या उपक्रमामुळे सातारा जिल्ह्यातील गणेशोत्सवातील वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वारसा डिजिटल स्वरूपात जतन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची माहिती देश-विदेशातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमासाठी स्वतंत्र ॲप डाउनलोड करण्याची आवश्यकता नसून, नागरिकांनी आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपतीचे चांगल्या दर्जाचे छायाचित्र तसेच गणेशोत्सवाची माहिती देणारा दोन ते चार ओळींचा मजकूर Bappa.org या मंचावर अपलोड करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, गणेश मंडळे आणि नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा. तसेच उपक्रमाची जिल्ह्यात व्यापक प्रसिद्धी करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत.
येथे करा छायाचित्रे व व्हिडीओ अपलोड
गणेशोत्सवाशी संबंधित स्थानिक कला, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक उपक्रमांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यासाठी Bappa.org हे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या माध्यमातून घरगुती गणपती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आपल्या गणेशोत्सवाची छायाचित्रे आणि व्हिडिओ अपलोड करता येणार आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!