
फलटण : ऐतिहासिक फलटण शहर, महानुभाव पंथीयाची दक्षिण काशी, संस्कृतिक वारसा असणाऱ्या फलटणमध्ये विकास काय असतो हे खऱ्या अर्थाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दाखवून दिले आहे. शहाराच्या विकासासाठी नगरपरिषद हे महत्वाचे माध्यम आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही दिलेला पैसा योग्य प्रकारे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचा असेल तर फलटणच्या नगराध्यक्षासहीत संपूर्ण नगरपालिका ही भाजपा-राष्ट्रवादी युतीच्या हातामध्ये देण हे अत्यंत क्रमप्राप्त आहे, त्यामुळे येत्या २० तारखेला तुम्ही कमळाचं आणि घड्याळाचे बटन दाबा, या २० तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या, पुढची पाच वर्ष तुमची काळजी घेण्याची हमी मी देतो अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणकरांना दिली.
फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीतील भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर व नगरसेवक पदाचे २७ उमेदवार यांच्या प्रचारार्थ, फलटण येथे आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, माजी आमदार राम सातपुते, जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील, धैर्यशील कदम, राम निंबाळकर, बाळासाहेब सोळसकर, शिवरूपराजे खर्डेकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर, ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर, मनीषा नाईक निंबाळकर, माणिकराव सोनवलकर, विश्वासराव भोसले, दिलिपसिंह भोसले, ॲड. नरसिंह निकम, प्रतिभा शिंदे यांच्यासह नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांची उपस्थिती होती.
महाराष्ट्रामध्ये साडेसहा कोटी लोक हे चाळीस हजार गावांमध्ये राहतात, आणि तेवढेच साडेसहा कोटी लोक फलटण सारख्या चारशे शहरांमध्ये राहतात. या चारशे शहरांचा चेहरा मोहरा जर आपण बदलला तर आपण साडेसहा कोटी लोकांच्या जीवनामध्ये एक गुणात्मक परिवर्तन आणू शकतो आणि म्हणून मागच्या काळात आम्ही जे काम चालू केले, आज जवळपास दोनशे ते अडीचशे शहर आपण बदलली आहेत व उर्वरित अनेक शहरे आपणास अजून बदलायची आहेत असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरांच्या विकासासाठी लाखो-कोटी रुपये दिले, मी हजारो कोटी रुपये दिले आहेत. शहरात विकास कामे राबविण्यासाठी नगरपालिका महत्त्वाचे माध्यम आहे त्यामुळे जर नगरपालिकेमध्ये आपला नगराध्यक्ष नसला, तर दिलेल्या पैशाचं काय होईल याची आपल्या सगळ्यांना भीती आहे. तुमच्याकरता दिलेला पैसा, तुमच्या शहराच्या परिवर्तनाकरता दिलेला पैसा हा तुमच्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही. शहराचं कधीच परिवर्तन होणार नाही आणि म्हणून मोदीजींनी आणि आम्ही दिलेला पैसा योग्य प्रकारे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचा असेल तर नगराध्यक्षासहित संपूर्ण नगरपालिका ही फलटणकरांना भाजपा-राष्ट्रवादी युतीच्या हातामध्ये द्यावी लागेल.

विकास काय असतो हे रणजितसिंह यांनी फलटणकरांना दाखवून दिले आहे
आपण जर फलटणचा विचार केला तर या ठिकाणी रणजीतदादांच्या नेतृत्वामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी आला आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्यांची काम आता या ठिकाणी चालू झालेली आहेत. फलटणकडे येणारे जेवढे मार्ग आहेत ते सगळे रणजीतदादांनी माझ्या आणि गडकरी साहेबांच्या मागे लागून त्या ठिकाणी मंजूर करून घेतले. त्यामध्ये फलटण पंढरपूर पालखी मार्ग सहा हजार कोटी रुपये, फलटण बारामती रस्ता ७९५ कोटी रुपये, फलटण पुसेगाव रस्ता परत केंद्र सरकारने ते काम चालू केलं, फलटण आदर्की साडेतीनशे कोटी रुपये, फलटण दहिवडी चार हजार कोटी रुपये, पाडेगाव ते शिंगणापूर ७०० कोटी रुपये, आसू गाव ते फलटण ते गिरवी २५० कोटी रुपये आणि फलटणचे अंतर्गत रस्ते १०० कोटी रुपये यांचा समावेश आहे. फलटण सारख्या शहरा करता एवढा निधी यापूर्वी कोणाच्या स्वप्नात तरी आला होता का ? जेवढा निधी आज खऱ्या अर्थानं रणजीतदादांच्या प्रयत्नातून आलाय आणि तो कागदावरचा नाहीये. ही सगळी कामं या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्षात दिसतात. त्यामध्ये फलटण शहरातील वारकरी भवन असेल, प्रशासकीय भवनाचे काम चाललेलं आहे, महसूल भवनाचं काम चाललेल आहे, या ठिकाणी दोन पोलीस स्टेशन उभे राहिले आहेत, पोलिसांकरता उत्तम क्वार्टर आपण त्या ठिकाणी उभे केलेले आहेत, अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू केलेल आहे, दिवाणी न्यायालय सुद्धा आपण त्या ठिकाणी मंजूर केलय, सध्या येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेल्या न्यायालयांची देखील पुढच्या काळामध्ये एकच इमारत या ठिकाणी आपण निर्माण करू. नाईकबोमवाडी येथे आपण रणजितदादांच्याच प्रयत्नातून एमआयडीसी तयार केली. परंतु नुसती एमआयडीसी तयार करून फायदा नाही, त्या ठिकाणी उद्योग ही आला पाहिजे. मी तुम्हाला आज सांगत नाही पण मी मागच्या वेळेस तुम्हाला शब्द देऊन गेलो, त्यानंतर जवळपास सात आठ मोठ्या उद्योजकांशी माझी बोलणी चालली आहेत आणि मी तुम्हाला दिलेला शब्द आहे, लक्षात ठेवा त्या ठिकाणी उद्योग आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आपल्या सगळ्या लोकांच्या हाताला जे काम आहे, ते मिळालं पाहिजे या दृष्टीने निश्चितपणे त्या ठिकाणी उद्योग देखील आणण्याचं काम आम्ही करू असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. एक शहर म्हणून ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या सगळ्या रणजितदादांनी या ठिकाणी मंजूर करून घेतल्या आहेत. त्यामध्ये क्रीडांगण, जलतरण तलाव, जिम, अभ्यासिका, नानानानी पार्क, तारांगण, नाट्यगृह या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या स्तरांवर त्याची मंजुरी ही दादांनी आणि आपल्या आमदार साहेबांनी मिळवली आहे. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फलटण शहराला शहराचा चेहरा मिळत आहे. फलटण हे महत्त्वाच व ऐतिहासिक शहर आहे. ते छत्रपती शिवरायांच्या इतिहासाशी तर जोडलेलच आहे परंतु प्रभू श्रीरामांच्या इतिहासाशीही जोडलेले शहर आहे. आणि म्हणून अशा या शहरामध्ये मोठ परिवर्तन झालं पाहिजे, शहर शहरासारखं वाटलं पाहिजे या दृष्टीने खऱ्या अर्थाने सगळी काम करण्याचा प्रयत्न आपण करतोय. म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे की काय टीका टिपन्नी होते, त्याकडे लक्ष देऊ नका. समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांना नगरपालिकेच्या कामकाजाचा अनुभव आहे, त्यांनी अतिशय ठाम भूमिका घेऊन सातत्याने आपली बाजू मांडली हे ध्यानात ठेवा.

आम्ही चांगले आहोत म्हणून सकारात्मकपणे मत द्या
नगरपरिषद निवडणुकांच्या निमित्ताने आपण राज्यभरात आपण वेगवेगळ्या शहरात गेलो. परंतु तेथे मी कोणत्याही पक्षावर अथवा नेत्यांवर टीका केली नाही. कारण माझ्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे. मी जे करून दाखवलय ते मी बोलतो, जे करणार आहे ते मी बोलतो. खऱ्या अर्थाने परिवर्तन घडविण्यासाठी सकारात्मकपणे मत मागण्यासाठी मी आपणाकडे आलो आहे. ते नालायक आहेत म्हणून मला मत द्या असे आपण म्हणणार नाही तर मी चांगला आहे चांगलं करून दाखवणार आहे माझा नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक चांगलंच करून दाखवणार आहेत म्हणून आम्हाला तुमचं मत हवं आहे. तुमच एक सकारात्मक मत हे निश्चितपणे फलटण शहराला या साताऱ्यातले एक आधुनिक शहर बनवू शकते. त्यामुळे आपल्याला मी एवढीच विनंती करणार आहे २० तारखेला निवडणूक आहे. दोन दिवस हातामध्ये आहेत. या दोन दिवसात पुन्हा चिखलफेक होईल, त्याची काही चिंता करू नका कारण कुठल्याच चिखलाने कमळाला फरक पडत नाही. वीस तारखेला मतदानाला जा व कुठे इकडे तिकडे पाहू नका जिथे कमळ आणि घड्याळ दिसेल तीथे बटन दाबा. २० तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या, पुढचे पाच वर्ष तुमची काळजी घेण्याची हमी मी घेतो अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही म्हणाले…
- पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य सरकारच्या माध्यमातून शहरांच्या विकासासाठी कोट्यावधींचा निधी देण्यात आला.
- स्वातंत्र्यानंतर सात दशके गावचा विकास करण्यावर भर देणाऱ्या नेत्यांना शहरांचा मात्र विसर पडला.
- शहरांमध्ये मूलभूत सुविधा व सर्वांगीण योजना याकडे दुर्लक्ष झाल्याने शहरे बकाल बनली.
- सांडपाणी व घाणपाणी यांचे नियोजन न झाल्याने हे पाणी ओढे, नाले, विहिरी, तलाव, नदी यामध्ये मिसळल्याने जलस्त्रोत दूषित बनले.
- देशाच्या जीडीपीच्या ६५ टक्के जीडीपी हा शहरामध्ये तयार होतो.
- केंद्र सरकारच्या माध्यमातून शहरांच्या विकासासाठी अनेक योजना निर्माण करण्यात आल्या.
- राज्य सरकारने शहरांमध्ये जेवढी रहिवासी अतिक्रमण आहेत, ती सगळी मंजूर करून त्या गरिबांना मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय केला.
- जोवर तुमचा देवाभाऊ आहे तोवर लडकी बहीण योजना बंद होणार नाही.
- महाराष्ट्रामध्ये नगरपालिकांच्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या खतांचा एक ब्रँड तयार केला आहे.
- आगामी काळात कचरा मुक्त शहर करण्यावर राज्य शासनाचा भर राहणार.
- राज्यातील सर्व शहरांमध्ये भुयारी गटार योजना राबविणार.
- लखपती दिदी कार्यक्रमांतर्गत राज्यात एक कोटी लखपती दिदी करणार.
