
फलटण : फलटण नगर परिषदेमध्ये सुमारे चार वर्षापेक्षाही जास्त कालावधीपासून प्रशासकीय राजवट लागू आहे. या प्रशासकीय राजवटीमध्ये नेमके कोणाचे ऐकले जात होते, हे फलटणकरांना चांगलेच माहिती आहे. त्यांनी जाणीवपूर्वक रस्त्याची व अन्य विकास कामे रखडवून लोकांना त्रास देण्याचे काम केले आहे. प्रशासकीय राजवटीमध्ये जाणीवपूर्वक जर विकास कामे रखडवली तर लोकांचा रामराजे यांच्या वरती रोष निर्माण होईल व त्याचा फायदा आपल्याला फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत घेता येईल असा विरोधकांचा डाव आहे परंतु जनता सुज्ञ आहे, त्यामुळे अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील व फलटण नगरपरिषदेत शिवसेनेचा धनुष्यबाणच विजयाचे लक्ष अचूकपणे भेदेल असा विश्वास कृष्णात तथा दादासाहेब चोरमले यांनी व्यक्त केला.
लक्ष्मीनगर, बारवबाग येथे मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर, प्रभाग ११ मधील उमेदवार प्रियांका निकम यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आमदार रामराजे यांनी २०२३ साली विकास कामांसाठी २० कोटी रुपये मंजूर करून आणले होते. त्यामधून अनेक कामे झाली परंतु काही कामे मंजूर असून देखील ठेकेदारांना ही कामे न करण्याबाबत सांगण्यात आले आहे असा आरोप करून दादासाहेब चोरमले म्हणाले, पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने विरोधकांकडून चुकीचे आरोप होत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत होते, परंतु फलटण शहर त्यास अपवाद ठरले होते. आमदार रामराजे यांच्या दूरदृष्टीमुळे दुष्काळी परिस्थितीतही फलटण शहरात स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा होत होता, हे जनतेला माहिती असल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपाला अर्थ उरत नाही. दुष्काळी परिस्थितीतही शहाराला तीन महिने पाणी पुरवठा होईल एवढी क्षमता येथील साठवण टँकची आहे. पाचवा टप्पा कार्यान्वित आहे. बारवबाग येथे कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने तेथे सुमारे ऐंशी लाखांच्या कमांतर्गत नव्याने पिण्याच्या पाण्याची टाकी बांधत आहोत. सदर काम आम्ही मंजूर केले आहे, त्याचे टेंडरही झाले आहे परंतु विरोधकांनी ते काम थांबाविले असल्याचे चोरमले यांनी निदर्शनास आणून दिले. आम्ही जनतेचे सेवक म्हणून कामे केलेली आहेत. जनतेचा आमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आमच्याच कामांची कॉपी काही विरोधक करीत आहेत, हे दुर्दैव असून त्यांच्याकडे विकासाबाबत कोणतेही व्हिजन नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. आम्ही विकासाचे व्हिजन घेऊन पुढे वाटचाल करणारे कार्यकर्ते आहोत. आ. रामराजे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अगामी काळातही चांगल्या दर्जाची विकासकामे करणार आहोत. विकास ही एक प्रक्रिया असून ती अविरतपणे सुरू असते, त्यामुळे कोणत्याही कामात त्रुटी असेल तर ती आगामी काळात निश्चितपणे दूर केली जाईल असेही दादासाहेब यांनी यावेळी स्पष्ट केले. गेल्या ३० ते ३४ वर्षांमध्ये आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण शहराला कोणतीही कमतरता भासली नाही. विकास नाही, विकास नाही अशा अफवा पसरून एक चुकीचा गैरसमज निर्माण करण्याचा विरोधकांकडून सातत्यपूर्वक प्रयत्न होत आहे. परंतु फलटण शहरातील जनता सुज्ञ आहे. आ. रामराजे यांच्या माध्यमातूनच फलटण शहराचा सर्वांगीण विकास झाला आहे व तो पुढील काळातही होत राहील हे जनता ओळखून आहे. त्यामुळे शिवसेनेचे व मित्र पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही दादासाहेब चोरमले यांनी यावेळी व्यक्त केला.
अनिकेतराजे यांच्याकडे विकासाचे व्हिजन
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे. विकासाचे एक वेगळे व्हिजन घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण फलटण शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. त्यामुळे पुढील पाच वर्षांमध्ये फलटण शहर एक आदर्श शहर बनल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास जनतेमध्ये आहे. त्यामुळे लोकांमध्ये चुकीच्या पद्धतीने प्रचार व प्रसार करणाऱ्या विरोधकांना जनताच धडा शिकवेल व त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असा विश्वास कृष्णात तथा दादासाहेब चोरमले यांनी व्यक्त केला.
