
फलटण : कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर एप्रिल आणि मे महिन्यात जिल्ह्याच्या कोणत्याही भागात नागरिकांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याबरोबरच ज्या ठिकाणी टँकरची मागणी येईल त्या भागाला टँकरने पाणी पुरवठा सुरु करावा. त्याचबरोबर जिल्ह्यातील धरणांमधील पाणी हे प्राधान्याने पिण्यासाठी राखीव ठेवण्यात यावे असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई आढावा बैठक पार पडली, या बैठकीत मंत्री देसाई यांनी सदर निर्देश दिले आहेत. बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, यांच्यासह सर्व प्रांत व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील नागरिकांना प्राधान्याने पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे, यासाठी संबंधित यंत्रणांनी सर्तक राहून कामे करावीत. गावासाठी किंवा वाडी वस्त्यांसाठी टँकरची मागणी आल्यास तात्काळ संबंधित गावाला भेट देऊन टँकर सुरु करावा, असे सांगून मंत्री देसाई म्हणाले, ग्रामीण भागातील पाण्याचे हातपंप बंद पडले आहेत, ते तातडीने दुरुस्त करावेत. ज्या ठिकाणी विंधन विहिरीची गरज आहे तेथे नव्याने विंधन विहिरी घ्याव्यात, तसेच दुरुस्तीचे कामे हाती घ्यावीत. टंचाई काळात शेतकऱ्यांचे देयका अभावी विज कनेक्शन तोडू नये. जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठा ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरेल या पद्धतीने पाणी साठवून ठेवावे. आवश्यक तेथे विहीर अधिग्रहीत करण्यासह अन्य आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. एकूणच पाण्याची टंचाई भासणार नाही यासाठी प्रशासनाने आवश्यक ते प्रयत्न करावेत असे निर्देशही पालकमंत्री देसाई यांनी यावेळी दिले.
