
फलटण : गर्भवती महिलांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना ५ हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. या आर्थिक सहाय्यामुळे गर्भवती महिलांना योग्य आहार, वैद्यकीय तपासणी आणि सुरक्षित प्रसूतीसाठी मदत मिळते. सातारा जिल्ह्यात २६ हजार ३०४ मुलींना या योजनेचा लाभ मिळाला आहे. देशातील लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेमुळे मातामृत्यू आणि बालमृत्यू दर कमी करण्यास मदत झाली आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना विशेषतः उपयुक्त ठरली आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (२.०) : मातृत्व काळात महिलांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना :
(माहिती दिनांक २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत)
गरोदर महिलांचे आरोग्य चांगले राहावे, मातेला योग्य विश्रांती आणि पोषक आहार मिळावा तसेच नवजात बालकाचा जन्म सुरक्षित व्हावा यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY 2.0) सुरू केली आहे. ही योजना १ एप्रिल २०२३ पासून सुधारित स्वरूपात देशभर लागू करण्यात आली असून महाराष्ट्रात ती महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र यांच्या माध्यमातून राबवली जाते.
या योजनेत केंद्र शासनाचा ६० टक्के आणि राज्य शासनाचा ४० टक्के आर्थिक सहभाग आहे. गरोदर महिलांनी शासकीय आरोग्य संस्थेमध्ये वेळेत नोंदणी करून या योजनेचा लाभ घेणे आवश्यक असते. लाभार्थी महिलेला शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून ५७० दिवसांच्या आत या योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र ज्या महिलांना नोकरीत वेतनासह मातृत्व रजा मिळते त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
योजनेचा मुख्य उद्देश :
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा उद्देश गरोदर महिलांना मातृत्व काळात आर्थिक मदत देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हा आहे.
योजनेचे फायदे :
- गरोदर महिलांना विश्रांती घेण्यासाठी मदत होते
- महिलांना सकस आणि पौष्टिक आहार घेता येतो
- प्रसूतीपूर्व तपासणी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते
- मुलीच्या जन्माचे स्वागत आणि प्रोत्साहन मिळते
यामुळे आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
योजनेअंतर्गत मिळणारा लाभ :
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना शासनाकडून थेट त्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत दिली जाते. - पहिल्या अपत्यासाठी एकूण ५ हजार रुपये आर्थिक सहाय्य
- दुसरे अपत्य मुलगी असल्यास ६ हजार रुपये आर्थिक सहाय्य
ही रक्कम लाभार्थीच्या आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस खात्यात थेट जमा केली जाते. ही प्रक्रिया Direct Benefit Transfer (DBT) पद्धतीने केली जाते.
लाभ मिळण्याचे टप्पे :
पहिला हप्ता : ३ हजार रुपये - शासकीय आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी करणे
- शेवटच्या मासिक पाळीपासून सहा महिन्यांच्या आत किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी करणे
दुसरा हप्ता : २ हजार रुपये - बाळाची जन्म नोंदणी करणे
- बाळाला आवश्यक प्राथमिक लसीकरण देणे (BCG, OPV, Pentavalent इ.)
दुसरे अपत्य मुलगी असल्यास : - मुलीच्या जन्मानंतर एकाच टप्प्यात ६ हजार रुपयांचा लाभ दिला जातो.
कोणाला लाभ मिळू शकतो ?
खालीलपैकी किमान एका गटातील महिला या योजनेस पात्र असतात - वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला
- अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या महिला
- ४० % किंवा अधिक दिव्यांगत्व असलेल्या महिला
- BPL शिधापत्रिका धारक महिला
- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत लाभार्थी महिला
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जॉब कार्ड धारक महिला
- ई-श्रम कार्ड धारक महिला
- अंगणवाडी सेविका, मदतनीस किंवा आशा कार्यकर्ती
- राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यानुसार शिधापत्रिका धारक महिला
योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक कागदपत्रे : - आधार कार्ड
- माता आणि बाल संरक्षण कार्ड
- लाभार्थीचे बँक पासबुक
- बाळाचे जन्म प्रमाणपत्र
- बाळाच्या लसीकरणाची नोंद
- RCH पोर्टलवरील नोंदणी क्रमांक
- मोबाईल क्रमांक
अर्ज प्रक्रिया :
या योजनेचा अर्ज प्रामुख्याने अंगणवाडी सेविका किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ऑनलाइन भरला जातो. अर्ज भरल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली जाते. सर्व माहिती योग्य असल्यास लाभार्थीचा अर्ज मंजूर केला जातो आणि नंतर राज्य स्तरावरून लाभार्थीच्या खात्यात आर्थिक रक्कम जमा केली जाते.
मातृत्व काळात महिलांसाठी महत्त्वाचा आधार :
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही गरोदर महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिक मदत मिळते, आरोग्य तपासण्या वेळेत होतात आणि नवजात बालकांचे आरोग्यही चांगले राहते.
मातृत्व काळ हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. अशा वेळी शासनाकडून मिळणारी ही आर्थिक मदत महिलांना आधार देणारी ठरते आणि समाजात सुदृढ माता व निरोगी बालक घडविण्यास मदत करते.
