
फलटण : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी महामार्गाचे काम करण्याची मला संधी मिळाली. पालखी मार्गांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग हा हरित मार्ग व्हायला हवा. या मार्गामुळे उद्योग, व्यापार वाढेल व शेतीमालाला वाहतूक सुविधा मिळाल्याने निश्चितपणे आर्थिक विकास होईल. स्वास्थ, शिक्षण, सेवा व विकास याबरोबरच उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या दोन्ही पालखी मार्गामुळे पंढरपूर वारी ही अधिक सोईची व प्रशस्त होईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी केले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग पाहणी दौरा आणि संवाद दौऱ्या दरम्यान सुरवडी ता. फलटण येथे हॉटेल निसर्ग येथे पत्रकारांशी संवाद, गडकरी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उपस्थिती होती.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग हा २६४ किलोमीटरचा आहे आणि त्याची किंमत ७ हजार ६२५ कोटी रुपये आहे, तर तुकाराम महाराज पालखी मार्ग हा जवळपास १३० किलोमीटरचा असून त्याची किंमत ४ हजार ४१६ कोटी रुपये इतकी आहे. या दोन्ही पालखी मार्गांचा विकास केवळ रस्ते बांधकामापुरता मर्यादित नसून, तो एक समग्र विकास मॉडेल म्हणून साकार झाला आहे असे निदर्शनास आणून देत ना. गडकरी म्हणाले, दरवर्षी, आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी संतांच्या पालखीसमवेत पंढरपूर धामाकडे भगवान विठ्ठलांच्या दर्शनासाठी प्रस्थान करतात. भारतभूमीच्या सनातन परंपरेत, वारकरी संप्रदायाची ही पदयात्रा श्रद्धा, तपस्या आणि समर्पणाचे जिवंत प्रतीक आहे. अनेक वर्षे ही पवित्र यात्रा विविध अडचणीला सामोरी जात होती. दोन्ही पालखी मार्गाचा व्यापक पुनर्विकास करण्यात आला असून, तो आता पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे पंढरपूर वारी ही अधिक सोईची व प्रशस्त होणार आहे. ज्ञानेश्वर पालखी मार्गाचे बांधकाम मोहोळ ते वाखरी, वाखरी ते खुडूस, खुडूस ते धरमपुरी, धरमपुरी ते लोणंद, लोणंद ते दिवे घाट आणि दिवे घाट ते हडपसर अशा सहा भागात करण्यात येत आहे. यापैकी चार भाग पूर्ण झाले आहेत. धरमपुरी ते लोणंद हे पूर्णत्वास (९८%) झाले असुन दिवे घाट ते हडपसर या भागात सुमारे ६५% काम झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर आहे ते मार्च २०२७ अखेर पूर्ण करण्याचे नियोजित आहे. दिवे घाटात वन विभागाची १७ हेक्टर जागा घेण्यात आली असल्याने आता घाटामध्ये रस्त्याची रुंदी २ वरून ४ लेनमध्ये वाढविण्यात येत असून, त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. या मार्गाचे चौपदरीकरण करताना वारकऱ्यासाठी दोन्ही बाजूस स्वतंत्र साडे तीन मीटरच्या लेनची तरतूद केल्याने वारी अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित होईल. आवश्यक त्या ठिकाणी फ्लायओव्हर, रेल्वे ओव्हरब्रिज, अंडरपास आणि आधुनिक पुलांच्या माध्यमातून हा मार्ग अधिक सुगम झाला आहे. ह्या मार्गावरील जड वाहतूक गावाच्या बाहेरून जावी याकरिता सासवड, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस आणि पंढरपूर यांसारख्या महत्वाच्या गावांना बाह्य वळण रस्ते (Bypass) देण्यात आले आहेत असे सांगून गडकरी म्हणाले, पालखी महामार्ग जरी धार्मिक उद्दिष्ट्या करता असला तरी पर्यटन असे क्षेत्र आहे की यातील ४९ टक्के भांडवली गुंतवणूक रोजगार निर्मिती करता खर्च होत आहे. त्यामुळे या मार्गामुळे त्या त्या भागात उद्योग व्यापार वाढीस लागेल वाहतूक खर्च कमी होईल शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी सुविधा प्राप्त होतील यामुळे निश्चितपणे आर्थिक विकास होईल. एकीकडे विठ्ठल आकृतीची श्रद्धा म्हणून पंढरपूरला भाविक येतील व जेवढे जास्त प्रमाणात भाविक येतील तेवढाच रोजगार वाढेल.
पालखी महामार्ग हरित मार्ग व्हावा..!
प्रदूषण आज एक गंभीर समस्या बनली आहे. पर्यावरण वाचवण्याचे आपणास सर्वांसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे पालखी मार्ग हा हरित मार्ग व्हायला हवा त्याकरिता या परिसरातील सर्व खासदार, आमदार, धार्मिक, सामाजिक, सहकारी, समाजसेवी संस्था व त्यांचे प्रतिनिधी यांनी या मार्गावर नवीन झाडे लावण्यासाठी व त्यांचे संगोपन करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन ना. नितीन गडकरी यांनी केले.
फलटण शहारासाठी ९७ कोटी मंजूर
फलटण शहराच्या वन टाईम इम्प्रूव्हमेंट साठी ९७ कोटी मंजूर करण्यात आल्याचे सांगून या कामाची निविदा प्रक्रिया सध्या चालू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल. यामध्ये फलटण शहरातील अरुंद रस्त्याचे व रावरामोशी पुलाचे रुंदीकरण होईल, यामुळे फलटण शहरात वाहतूक कोंडी होणार नाही. तसेच पालखीच्या वेळेस रुंद रस्ता असल्यामुळे वरकऱ्याना चालणे सोयस्कर होईल असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.
भाषणातील अन्य महत्वाचे मुद्दे :
- दोन्ही पालखी मार्गाच्या कामादरम्यान ४३ तलावांचे खोलीकरण करुन ३३. ४५ लक्ष टन माती / मुरुम महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात आला. यामुळे ३३४५ TCM (Thousand Cubic Meter) इतका अतिरिक्त जलसंचय साठा निर्माण झाला.
- रस्ते बांधकामा दरम्यान येणारी अंदाजे ४५०० झाडे ट्रान्सप्लांट करून त्यांना नवजीवन देण्यात आले आहे, तसेच मार्गाच्या दोन्ही बाजूंनी व्यापक वृक्षारोपण करण्यात आले आहे व नवीन चाळीस हजार झाडे लावण्यात आली आहेत.
- जेजुरी दोन किलोमीटर लांबीचा व २५० कोटींचा उड्डाण पूल बांधण्यात येणार त्यामुळे जेजुरी गड दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल व शहरातील अपघाताचे प्रमाण कमी होईल.
- तोंडले (सोलापूर) या ठिकाणी दोन्ही पालखी मार्ग मिळतात. त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येईल.
- पंढरपुर शहराभोवतीच्या ४० किलो मीटरच्या प्रस्तावित रिंग रोडच्या कामापैकी १३ किलोमीटर मंजूर काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पंढरपूरला पूर्णपणे रिंग रोड उपलब्ध होईल, ज्यामुळे वारकरी आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

