
फलटण : सातारा येथे दिनांक १४ ते १७ मे दरम्यान होणाऱ्या ५० व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेसाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही देत सातारा शहराचे नाव देश पातळीवर उंचावेल असे नियोजन करावे अशी सुचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या अनुषंगाने तेथील तयारीचा आढावा जिल्हाधिकारी पाटील यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
आरोग्य विभागाने महत्त्वाच्या गरजेच्या औषधांचा पुरवठा ठेवावा व स्टाफचीही व्यवस्था करावी, आयोजकांनी खासगी रुग्णालयाशी करार करून उपचारांची व्यवस्था व आयसीयू बेड राखीव ठेवावेत. येणाऱ्या स्पर्धकांच्या राहण्याची चांगली व्यवस्थ करावी. जास्तीत जास्त प्रेक्षक उपस्थित रहावेत यासाठी व्यवस्था करावी. प्रेक्षकांच्या सुरक्षेची चोख व्यवस्था स्पर्धास्थळी ठेवावी. कुस्ती आखाडे व प्रेक्षक यांच्या मध्ये बॅरिकेट लावावेत. पार्किंगची व्यवस्था ठेवावी. येणाऱ्या अतीमहत्वाच्या व्यक्तींसाठी हेलिपॅडची पर्यायी व्यवस्था करावी. वाहतूक व्यवस्थेसाठी आयोजकांनी पोलिस विभागाशी समन्वयाने नियोजन करावे. उपस्थित असणाऱ्या अती महत्वाच्या व्यक्तींची माहिती लवकर द्यावी. सातारा शहराचे नाव देश पातळीवर उंचावेल, असे नियोजन करावे. पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था करावी. विद्युत व्यवस्था तपासून योग्य असल्याची खात्री करावी,सर्व व्यवस्था सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असल्याची तपासणीसंबंधीत विभागाने करावी. अशा सूचनाही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी यावेळी दिल्या.

