
फलटण : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी इच्छुक युवक-युवतींसाठी महाराष्ट्र शासनातर्फे छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे Combined Defence Service (CDS) परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विशेष प्रशिक्षण कोर्स आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक १५ जून २०२६ ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत CDS कोर्स क्रमांक ६७ राबविण्यात येणार असून निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींनी १४ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता प्रशिक्षण केंद्रात उपस्थित राहायचे आहे. या कालावधीत प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षणासह निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
सातारा जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी ८ जून २०२६ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे मुलाखतीस उपस्थित राहावे. उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune च्या अधिकृत संकेतस्थळ mahasainik.maharashtra.gov.in वर जाऊन DSW Portal मधील “Resources – PCTC Nashik-CDS-67” या विभागातून प्रवेशपत्र व संबंधित परिशिष्टांची प्रिंट काढून ती पूर्ण भरून सोबत आणणे आवश्यक आहे.
या प्रशिक्षणासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक असून लोकसंघ आयोग (UPSC), नवी दिल्ली यांच्या CDS परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज केलेला असावा.
अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल. ई-मेल : training.petenashik@gmail.com तसेच दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ आणि व्हॉट्सअॅप क्रमांक ९१५६०७३३०६ उपलब्ध आहेत.
या संधीचा लाभ घेऊन भारतीय सशस्त्र दलात अधिकारी पदावर सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल सतेश हंगे यांनी केले आहे.

