
फलटण : समाजसेवा, महिला सशक्तीकरण, अध्यात्म आणि राजयोग ध्यानाच्या माध्यमातून निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या ब्रह्माकुमारी डॉ. सुवर्णा कृष्णा ताटे यांना ‘महिला सशक्तीकरण एवं आध्यात्मिक नेतृत्व पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
लक्सोरा मीडिया अँड इव्हेंट्स आणि सक्सेस बिगिनिंग मीडिया सोल्युशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सक्सेस बिझनेस अवॉर्ड्स २०२६’ या कार्यक्रमात मरिना ड्रीम्स बँक्वेट, वझीरपूर, नवी दिल्ली येथे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास प्रसिद्ध अभिनेत्री शमिता शेट्टी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते ब्रह्माकुमारी डॉ. सुवर्णा ताटे यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी ब्रह्माकुमारी परिवारातील प्रतिनिधीही उपस्थित होते.
ब्रह्माकुमारी डॉ. सुवर्णा ताटे या अनेक वर्षांपासून राजयोग ध्यान, आध्यात्मिक ज्ञान, नैतिक मूल्यांचे संवर्धन, व्यक्तिमत्त्व विकास तसेच महिला सशक्तीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय व निःस्वार्थ सेवा देत आहेत. त्यांच्या प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सन्मानामुळे ब्रह्माकुमारी परिवारासह नागठाणे व परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

