अगामी काळात फलटणचा आमदार शिवसेनेचाच होणार ; शेतकऱ्यांना नाडून, जबरदस्ती करून जमीन संपादित होणार नाही : मंत्री उदय सामंत

फलटण : फलटण विधानसभा मतदार संघ हा आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात सक्षम असल्याने येथे आम्हाला अधिक मार्गदर्शन करण्याची आवश्यक्ता नाही. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे येथील शिवसेना अधिक सक्षम बनली आहे त्यामुळे या मतदारसंघातील भविष्यातील आमदार शंभर टक्के हा शिवसेनेचाच होईल असा विश्वास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री व शिवसेना नेते ना. उदय सामंत यांनी व्यक्त केला.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघ पदाधिकारी निवड आढावा, बीएल-२ नोंदणी अभियान व फलटण नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांनाचा सत्कार समारंभाचे आयोजन कोळकी ता. फलटण येथील अनंत मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते, त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार राहूल शेवाळे, खासदार ज्योती वाघमारे, माढा लोकसभा संपर्क प्रमुख पै. चंद्रहार पाटील, हिंद केसरी पै. संतोष वेताळ, संजीवराजे नाईक निंबाळकर, चंद्रकांत जाधव, अनिकेतराजे नाईक निंबाळकर, विश्वजितराजे नाईक निंबाळकर, युवासेना संपर्क प्रमुख सुजीत खुडे, संपर्क प्रमुख विराज खराडे, तालुका प्रमुख नानासो इवरे, पंचायत समितीचे माजी सभापती, शंकरराव माडकर, रेश्मा भोसले आदिसह पक्षाचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
शिवसेनेत गटबाजीला, मतभेदाला कदापी थारा मिळणार नाही. नवीन निवडण्यात येणारे पदाधिकारी हे गटबाजी करणारे नव्हे तर कार्यकर्त्यांना ताकद देणारे असायला हवेत अशी भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे. पक्षाचा प्रवास अधिक ताकतीने पुढे न्यायचा असेल तर आपला बीएलए शंभर टक्के सक्षम असला पाहिजे. महाराष्ट्रातील पक्षाचे जवळपास पावणे दोन लाख बूथ प्रमुख (बीएलए) यांना व त्यांच्या कुटुंबांना संरक्षण देण्याचे काम एकनाथराव शिंदे भविष्यामध्ये करणार आहेत, आणि असे करणारे ते देशातील एकमेव नेतृत्व ठरणार आहेत. जर प्रत्येक बूथ प्रमुखाने प्रतिदिन दोन तास प्रामाणिकपणे काम करायचं ठरवलं तर देशामध्ये सर्वात जास्त उभारी घेणारा पक्ष म्हणून शिवसेना नावारूपाला येईल असे निदर्शनास आणून देत मंत्री सामंत म्हणाले, फलटण तालुक्यात अतिरिक्त एमआयडीसी व्हावी अशी भूमिका आ. रामराजे व इथल्या सर्व नेतृत्वांनी आपणासमोर मांडली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा येथे दौरा झाला तेव्हा त्यांनी देखील याबाबत शब्द दिला, त्यामुळे एकनाथराव शिंदे यांचा शब्द म्हणजे काळया दगडावरची भगवी रेष आहे. पुढच्या काही दिवसात येथे विस्तारित एमआयडीसी करण्यात आम्हाला यश प्राप्त होणार आहे. परंतु याबाबत शेतकऱ्यांच्या काही अडचणी आहेत, तेव्हा आपण स्पष्टपणे सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना नाडून व त्यांच्यावरती जबरदस्ती करून कुठेही जमीन संपादित केली जाणार नाही. शेतकऱ्यांना जे पाहिजे ते देऊन आम्ही जमीन संपादित करू आणि येत्या काही दिवसांमध्ये इथे एमआयडीसी निर्माण करू. जर अशाप्रकारचे उद्योग उभे केले तर शिवसेनेला निश्चितपणे ताकद मिळणार आहे.

मंत्रीमहोदयांच्या कानपिचक्या व सज्जड इशारा !
जिल्हा प्रमुखांनी आमदारांच्या, खासदारांच्या गाड्यांची दार उघडण्यापेक्षा शिवसेना व एकनाथ शिंदे यांचा विचार जर आपण तळागाळात नेला पाहिजे व आमदार देखील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला आदराने घाबरला पाहिजे एवढी जर ताकद जिल्हाप्रमुखांनी निर्माण केली तर कुठचाही माईकालाल या महाराष्ट्रात शिवसेनेला पराभूत करू शकणार नाही एवढी ताकद आपणा सर्वांमध्ये आहे. कोण कोणाचा उजवा आहे डावा आहे म्हणून आता कोणालाही पदे मिळणार नाहीत. जो सक्षमपणे एकनाथ शिंदे यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवेल तोच आता भविष्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा पदाधिकारी असणार आहे याची नोंद अनेकांनी घेतली पाहिज. जो खाली बसून साहेबांचे काम प्रामाणिकपणे करत असेल त्याला उचलून व्यासपीठावरती बसाविण्याची भूमिका शिवसेना म्हणून आम्ही सगळे घेणार आहोत. अन्य पक्ष्यांशी संबंध असायला नकोत अशी आपली भूमिका नाही परंतु ते शिवसेनेला बाधक ठरतील असे असता कामा नयेत. मला काहीतरी मिळणार आहे म्हणून पक्ष दावणीला बांधायचा हे आता आगामी काळात चालणार नाही. अशा शब्दात चमकोगिरी करणार्यांना मंत्री सामंत यांनी फटकारले.
पोटॅशियम कंपनीला सहकार्य करू
पोटॅशियम बनविणारी जगातील तीन नंबरची जी कंपनी आहे, ती आपल्या फलटण येथे कार्यरत आहे. आजवर राज्यात आम्ही कारखानदारांचा पश्चिम महाराष्ट्र म्हणून ओळखत होतो परंतु जगातील तीन नंबरचा कारखाना संजीवराजे तुम्ही उभा केला तेव्हा उद्योगमंत्री म्हणून आपण सांगतो की, पश्चिम महाराष्ट्र हा साखर कारखानदारांचा तर आहेच परंतु आता तो तुमच्या निमित्ताने जगाला पोटॅशियम देणारा देखील तयार झाला हे आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. या कारखान्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याची आपली इच्छा आहे त्या अनुषंगाने जगातील तीन नंबरच्या कंपनीला जर औद्योगिक वसाहतीमध्ये जागा लागणार असेल तर येत्या महिनाभरामध्ये त्यासाठी लागणारी आवश्यक ती जागा दिली जाईल व जास्तीत जास्त बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न आमच्याकडून निश्चितपणे केला जाईल अशी ग्वाही ना. उदय सामंत यांनी यावेळी दिली.
संजीवराजे यांना आमदार करा….
मंत्री सामंत यांचे भाषण सुरु असताना उपस्थितांमधून संजीवराजे नाईक निंबाळकर यांना आमदार करा अशी जोरदार मागणी करण्यात आली. तेव्हा जे निर्णय घेणे आमच्या हातामध्ये आहेत ते आम्ही जरूर घेऊ परंतु आपल्या मागणी बाबतचा निर्णय हे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे घेऊ शकतील, जर संजीवराजे यांना महत्वाची संधी अथवा जबाबदारी मिळणार असेल तर आम्हा सर्वांना त्यामध्ये निश्चितपणे आनंदच आहे, संजीवराजे यांच्या प्रति आपल्या सर्वांच्या ज्या भावना आहेत, मागणी आहे ती निश्चितपणे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या पर्यंत पोहचविली जाईल असे आश्वासन ना. सामंत यांनी यावेळी दिले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!