
फलटण : संस्थान काळापासुन आजवर फलटण शहर अथवा तालुक्याला जातीय तेढ अथवा धार्मिक दंगालींचा इतिहास नाही. पूर्वीची पिढी व विद्यमान पिढी यांचा हा एकीचा वारसा जोपासण्यात मोलाचे योगदान आहे, त्यामुळेच शहर व तालुक्याची एकता आजही अबाधित आहे. आगामी काळात सर्वच धर्मीयांचे होणारे सण शांततेत व सलोख्याने पार पडतील असा विश्वास तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी व्यक्त केला.
फलटण शहर पोलीस ठाणे येथे बकरी ईद च्या निमित्ताने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, सदर बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे, पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांची उपस्थिती होती.
बाहेर कोठेतरी एखादी घटना घडल्याचे सोशल मीडियावरून समजते त्याबाबत कोणीतरी एखादी प्रतिक्रिया व्यक्त केल्याने सामाजिक शांती बिघडते परंतु असे प्रकार होऊ नयेत याकरिता विशेषतः तरुण पिढीच्या पालकांचीही भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे जागरूक पालक व समाजातील एक जबाबदार घटक आणि नागरिक म्हणून आपली जबाबदारी निश्चितपणे पार पाडतील असा विश्वास यावेळी डॉ. अभिजीत जाधव यांनी व्यक्त केला. अगामी काळात सर्वच धर्मीयांचे होणारे सण शांततेत व सालोख्याने पार पडतील व शांतता, एकी व पुरोगामी विचारांचा वसा पुढे नेण्याचा विचार पुढील काळात देखील अबाधित राहील. जर कुठेही एखादी अप्रिय अथवा बेकायदेशीर घटना घडत असेल तर ती आपणापर्यंत अथवा पोलीस प्रशासनापर्यंत जरूर कळवावी. समाजकंटकांविरोधात निश्चितपणे कायदेशीर कारवाई होईल असा इशारा देखील डॉ. जाधव यांनी यावेळी दिला.
बैठकीस शांतता कमिटी सदस्य, मोहल्ला कमिटी सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. आभार पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी मानले.
बकरी ईद सणानिमित्त नगरपालिकेकडून तात्पुरता परवाना घेऊनच कत्तलखाना चालू करावा. तसेच गाय, वासरू व खोंड आणून कोणीही त्याची कत्तल करू नये. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी तसे झाल्यास नवीन शासन परिपत्रक नुसार जी व्यक्ती अवैध कत्तल करेल त्या व्यक्तीस अथवा टोळीस मोक्का लावण्यात येईल, तशा कत्तलखाना धारकांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना बीएनएनएस कलम १६८ प्रमाणे नोटीसही देण्यात आल्या आहेत.
विशाल खांबे, पोलीस उपअधिक्षक, फलटण विभाग

