सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीसाठी चुरशीने ९९. ८९ टक्के मतदान ; २२ जूनला निकाल

फलटण : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या व मोठी चुरस निर्माण झालेल्या महाराष्ट्र राज्य विधान परिषद सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी एकूण ९९.८९ टक्के मतदान पार पडले. बारा पैकी खानापूर (विटा) वगळता अन्य अकरा मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदान झाले. सोमवार दि. २२ जून रोजी या निवडणुकीचा निकाल सांगली येथे जाहीर होणार असून त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहीले आहे.
या मतदार संघात महायुतीच्या वतीने धैर्यशील कदम तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मधून अभयसिंह जगताप हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदारांच्या कागदोपत्रीच्या आकडेवारी वरुन महायुतीची बाजू जरी वरचढ वाटत असली तरी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडी वेळी झालेल्या राड्यामुळे या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. सांगली जिल्ह्यात देखील महाविकास आघाडीने भाजप समोर तगडे आव्हान उभारल्याचे चित्र होते. गुरुवार दि. १८ जुन रोजी या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत सातारा जिल्ह्यातील सात व सांगली जिल्ह्यातील पाच अशा एकूण बारा मतदान केंद्रावर पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत ८९५ पैकी ८९४ मतदारांनी मतदानाचा हक्क बाजावला. यावेळी केंद्रनिहाय मतदारांची संख्या, झालेले मतदान व टक्केवारी पुढील प्रमाणे.

सातारा जिल्हा –
१) तहसील कार्यालय वाई – एकूण मतदार ११०, झालेले मतदान शंभर टक्के.
२) तहसील कार्यालय फलटण – एकूण मतदार ३१, झालेले मतदान शंभर टक्के.
३) तहसील कार्यालय माण – एकूण मतदान ५८, झालेले मतदान शंभर टक्के.
४) तहसील कार्यालय कोरेगाव – एकूण मतदान ४२, झालेले मतदान शंभर टक्के.
५) तहसील कार्यालय सातारा – एकूण मतदान १५२, झालेले मतदान शंभर टक्के.
६) तहसील कार्यालय पाटण – एकूण मतदान १९, झालेले मतदान शंभर टक्के.
७) तहसील कार्यालय कराड – एकूण मतदान ६०, झालेले मतदान शंभर टक्के.

सांगली जिल्हा –
८) तहसील कार्यालय कडेगाव – एकूण मतदान ४२, झालेले मतदान शंभर टक्के.
९) प्रांत कार्यालय खानापूर (विटा) – एकूण मतदान ९७, झालेले मतदान ९६, ९८.९७ टक्के.
१०) तहसील कार्यालय वाळवा (ईश्वरपूर) – एकूण मतदान ८२, झालेले मतदान शंभर टक्के.
११) पुरवठा विभाग अप्पर तहसील कार्यालय सांगली – एकूण मतदान १५७, झालेले मतदान शंभर टक्के.
१२) तहसील कार्यालय जत – एकूण मतदान ४५, झालेले मतदान शंभर टक्के.

एकूण मतदान ८९५ झालेले मतदान ८९४ (४५८ पुरुष, महिला ४३६) मतदानाची टक्केवारी ९९. ८९ टक्के.

निकाल २२ जूनला… मतमोजणी सांगलीला
या निवडणुकीची मतमोजणी सोमवार दि. २२ जून रोजी सांगली येथे तरुण भारत व्यायाम मंडळ इमारत येथे सकाळी आठ वाजता होणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!