एफडीएची गाडी दिसताच व्यापारी टरकले !; दुकाने, पानटपऱ्यांना टाळे, नागरिकांत चर्चेला उधाण

Food and drug administration symbol icon

फलटण प्रतिनिधी : फलटण शहरात सोमवार दि. १५ जुन रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक अनेक किराणा, पानटपऱ्या व इतर व्यावसायिक दुकाने बंद झाल्याने काही काळ शहरात बंदसदृश वातावरण निर्माण झाले. नेमके काय घडले, याची माहिती नागरिकांना मिळत नसल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र चौकशीअंती अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे पथक फलटणमध्ये दाखल झाल्याची चर्चा वाऱ्याच्या वेगाने पसरल्याने व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाल्याचे चित्र दिसून आले.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास एफडीएच्या पथकाची एक गाडी राम मंदिर परिसरात दिसून आली. एवढीच माहिती शहरात पसरताच अनेक व्यापाऱ्यांची धावपळ सुरू झाली. काहींनी तातडीने दुकानांचे शटर खाली ओढले, तर काहींनी बाहेरून कुलूप लावून दुकान बंद केले. गुटखा विक्री होत असल्याची चर्चा असलेल्या पानटपऱ्या व अन्य काही व्यावसायिक दुकानांनीही खबरदारीच्या नावाखाली तत्परतेने व्यवसाय बंद केल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, पथक प्रत्यक्ष कारवाई करत असल्याची कोणतीही अधिकृत माहिती नसतानाही काही व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झालेली धास्ती नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरली. काही वेळाने संबंधित पथक परिसरातून निघून गेल्याचे समजताच अनेक व्यापाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र या घटनेनंतर शहरात वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. “जर सर्व काही नियमांनुसार असेल तर एवढी भीती कशाची ?” आणि “भेसळ नाही, अनधिकृत माल नाही, तर दुकानांना टाळे लावण्याची गरज काय ?” असे सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीची धास्ती व जरब व्यापाऱ्यांमध्ये किती आहे, याची प्रचिती या घटनेतून दिसून आल्याची चर्चा शहरात रंगली आहे. अनेक नागरिकांनी फलटण शहर व परिसरातील खाद्यपदार्थ, किराणा माल, दुग्धजन्य पदार्थ, गुटखा विक्री तसेच भेसळयुक्त अन्य मालाची विक्री याबाबत व्यापक तपासणी मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. केवळ अधूनमधून भेटी देऊन औपचारिक कारवाई करण्यापेक्षा सातत्यपूर्ण तपासणी, नमुने संकलन आणि दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा अशा अचानक भेटी आणि त्यानंतर निर्माण होणारी खळबळ यापलीकडे कोणताही ठोस परिणाम दिसून येणार नाही असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

नागरिकांचा सवाल…
फलटण शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाची एक गाडी शहरात दिसली आणि अनेक दुकाने पटापट बंद झाली, यावरूनच परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात येते. फलटण शहरात भेसळखोर, अवैध गुटखा विक्री करणारे आहेत काय असा थेट सवाल या निमित्ताने नागरिकांमधून उपस्थित होत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने प्रत्यक्ष तपासणी मोहीम राबवून सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी या निमित्ताने व्यक्त होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!