
फलटण : फलटण तालुक्यात ठिकठिकाणी वीज ग्राहकांच्या हक्कावर गदा आणून व त्यांच्यावर दबाव टाकून त्यांच्या संमतीविना स्मार्ट मिटर बसाविण्याचे काम सुरु आहे. यामुळे वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व संतापाचे वातावरण आहे. वीज ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसविणे तात्काळ थांबवावे. स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेमुळे जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यास सर्वस्वी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) जबाबदार राहील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने निवेदणाद्वारे देण्यात आला आहे.
फलटण तालुक्यात विविध भागात तसेच साखरवाडी परिसरातील होळ गावासह आजूबाजूच्या भागात वीज ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना, लेखी नोटीस किंवा संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू करण्यात आल्याचा आरोप होत असून, यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ग्राहकांना कोणतीही माहिती न देता, त्यांच्या शंकांचे निरसन न करता आणि विश्वासात न घेता महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याची घाई सुरू असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. संघटनेने महावितरणला स्पष्ट इशारा देत, वीज ग्राहकांना पूर्वसूचना देणे, आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेणे या प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तात्काळ थांबवावे, अशी मागणी केली आहे. सदर मागणी दुर्लक्षित करून मनमानी पद्धतीने स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न सुरूच राहिल्यास लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल. तसेच या प्रक्रियेमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) यांचीच राहील, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.

निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे, साखरवाडी विभाग प्रमुख किरण भोसले, दासाराम भोसले यांच्या सह्या आहेत. सदर निवेदन साखरवाडी येथील सहाय्यक अभियंता राहुल आसापुरे, आनंद जाधव यांना देण्यात आले. यावेळी ग्रामस्थांची उपस्थित होती.
दरम्यान स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीबाबत सर्वत्र शंका आणि विरोधाचे वातावरण असताना, होळ गावासह साखरवाडी परिसरातही या प्रश्नावर संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मागणीबाबत महावितरण कोणती भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

