अल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी कालावधीच्या वाणांवर भर ; पीक विमा व ॲग्रीस्टॅक फार्मर आयडीसाठी कृषी विभागाचे आवाहन

फलटण : अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी होण्याची तसेच पिकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन फलटण तालुका कृषी विभागाने विविध उपाययोजनांना गती दिली आहे. शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणाऱ्या विविध पिकांच्या वाणांची लागवड करावी, तसेच पीक विमा योजनेत अधिकाधिक सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
कृषी विभागामार्फत सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून गावपातळीवर खरीप मोहिमेअंतर्गत जनजागृती सुरू असून ऊस पाचट व्यवस्थापन, बीजप्रक्रिया, बियाणे उगवण चाचणी, आपत्कालीन पीक नियोजन, माती परीक्षण, जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खत व्यवस्थापन, हिरवळीच्या खतांचा वापर, डिजिटल शेती, पाणी फाउंडेशन उपक्रम, शिवार फेरी तसेच कृषी आधारित प्रक्रिया युनिट उभारणी आदी विषयांवर प्रचार-प्रसिद्धी केली जात आहे. या सोबतच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेंतर्गत मागील चार वर्षांत फलटण तालुक्यात १६८ लघु प्रकल्प उभे राहिले असून अनेक उद्योजकांना त्याचा लाभ झाला आहे. चालू वर्षात आणखी ४० प्रकल्पांचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. पीएम-किसानसह कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तातडीने फार्मर आयडी तयार करून विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
गत पाच वर्षांतील पर्जन्यमान…
फलटण तालुक्यात मागील पाच वर्षांतील पावसात मोठी चढ-उतार दिसून आली आहे. सन २०२१ मध्ये ४७९ मि.मी. (सरासरीच्या ९६ टक्के), २०२२ मध्ये ६६९ मि.मी. (१३५ टक्के), २०२३ मध्ये केवळ २१९ मि.मी. (४४ टक्के), २०२४ मध्ये ६६५.३ मि.मी. (१४५ टक्के) तर २०२५ मध्ये ४७२.४ मि.मी. (१०२.७ टक्के) पाऊस नोंदविण्यात आला आहे.
महाडीबीटी योजनेंतर्गत यांत्रिकीकरणाला चालना…
महाडीबीटी योजनेंतर्गत फलटण तालुक्यात कृषी यांत्रिकीकरणाला मोठी चालना मिळत आहे. मागील वर्षी १४ हजार ४०० शेतकऱ्यांची निवड झाली होती. त्यापैकी २ हजार ५७ शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्यात आली असून १ हजार ९१४ शेतकऱ्यांनी विविध घटकांचा लाभ घेतला आहे. यातील १ हजार ४९२ लाभार्थींना सुमारे १२ कोटी ५४ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात येत आहे. ही योजना पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविली जात असून लॉटरी प्रणालीद्वारे लाभार्थी निवड केली जाते.
खरीपासाठी खत व बियाण्यांचा पुरेसा साठा…
यंदा खरीप हंगामासाठी तालुक्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. यामध्ये ६,६४४ मेट्रिक टन युरिया, १,८३२ मेट्रिक टन डीएपी, १,८९३ मेट्रिक टन एसएसपी, ७७१ मेट्रिक टन एमओपी आणि ५,९१८ मेट्रिक टन संयुक्त खतांचा समावेश आहे. याशिवाय ५८९ मेट्रिक टन युरिया आणि ६५ मेट्रिक टन डीएपीचा बफर स्टॉकही मंजूर करण्यात आला आहे. खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून शेतकऱ्यांनी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार संतुलित खतांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तसेच खरीपासाठी आवश्यक विविध पिकांचे बियाणे कृषी केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!