फलटण नगर परिषदेच्या विशेष सभेत २१ विषयांना मंजुरी ; ‘रामराजे उद्याना’चे नाव बदलून ‘संत सगुणामाता उद्यान’ होणार !

फलटण : फलटण नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या विशेष सभेमध्ये आगामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीसह शहरातील विविध विकासकामांच्या एकूण २१ विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. या सभेत सगुणामातानगर येथील साई मंदिरा समोरील उद्यानाचे नाव बदलण्याचा विषय चांगलाच चर्चेत राहिला. या उद्यानास सध्या ‘रामराजे उद्यान’ असे नाव असून त्याचे नाव बदलून ‘संत सगुणामाता उद्यान’ असे करण्यास या सभेत हिरवा कंदील दाखविण्यात आला.
फलटण नगरपरिषदेत पार पडलेल्या या विशेष सभेमध्ये आगामी आषाढी वारी व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या लाखो भाविकांसाठी दर्शन बारी उभारणे, हिरकणी कक्ष तयार करणे आणि विशेष स्वच्छतेच्या मोहिमेसह वारीशी संबंधित १९ महत्त्वाच्या कामांना तातडीने मंजुरी देण्यात आली. याशिवाय, फलटण शहरात छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, महाराणी सईबाई आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य पुतळे उभारण्याच्या प्रस्तावांनाही सर्वानुमते मान्यता देण्यात आली. अल्पसंख्याक विकास योजनेंतर्गत अहिंसा मैदान निवारा शेड उभारणे व कुरेशी नगरमधील विविध विकासकामे मंजूर करण्यात आली. शहरातील एकूण २१ खुल्या जागा नगरपरिषदेच्या नावे हस्तांतरित करण्याची शासकीय प्रक्रियाही या सभेत मार्गी लागली. उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता शहरातील जुने हातपंप तातडीने दुरुस्त करणे, नवीन बोअरवेल मंजूर करणे आणि गोळीबार मैदान येथे तब्बल पाच लाख लिटर क्षमतेची भव्य पाण्याची टाकी बांधण्यास संमती देण्यात आली, तर काळूबाई नगर येथील पाण्याची टाकी तात्काळ कार्यान्वित करण्याचे आदेशही यावेळी प्रशासनाला देण्यात आले.
नगराध्यक्षांनी ठेवला नि:स्पृहतेचा आदर्श..!
फलटण नगरपरिषदेच्या विशेष सभेत सगुणामाता नगर येथील उद्यानाच्या नामकरणाचा विषय विशेष चर्चेचा ठरला. विरोधी पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी उद्यानाला माजी खासदार, दिवंगत लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी अत्यंत संयमी व नि:स्पृह भूमिका घेत स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर हे स्वतःचे वडील असतानाही, त्यांच्या नावाने अनेक खाजगी संस्था व उपक्रम आधीच कार्यरत असल्याचे सांगत शासकीय उद्यानाला ‘संत सगुणामाता उद्यान’ हेच नाव देणे उचित ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या निर्णयाचे जनतेतून स्वागत व कौतुक व्यक्त होत आहे.

नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा इशारा..!
सभेत शहरातील खुल्या जगांवरील अतिक्रमणाचा गंभीर मुद्दा काँग्रेसचे नगरसेवक पंकज पवार यांनी लावून धरला. यावर आक्रमक पवित्रा घेत नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी कामचुकार अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले. पुढील सभेपूर्वी शहरातील अतिक्रमण पूर्णपणे न हटवल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर थेट घरी बसण्याची वेळ येईल, असा थेट इशारा त्यांनी दिला. त्याचबरोबर जे अधिकारी व कर्मचारी यांची स्वच्छते बाबत तक्रारी प्राप्त होतील व त्यामध्ये तथ्य आढळले तर त्यांचे पगार निघणार नाहीत असा इशारा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी यावेळी दिला.

१६ ओपन स्पेस होणार हस्तांतरित
मंजूर रेखांकनातील खुल्या जागा व रस्ते स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हस्तांतरित करणे विकासकासाठी बंधनकारक असून फलटण शहरातील अशा सुमारे १६ खुल्या जागा सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक असल्याने त्यांचे नगर परिषदेकडे हस्तांतरण आवश्यक असल्याचा ठराव या विशेष सभेत मंजूर करण्यात आला, त्यानुसार गोळीबार मैदान येथील ६, स्वामी विवेकानंदनगर येथील ८ आणि लक्ष्मीनगर येथील २ अशा एकूण १६ खुल्या जागा या ठरावानुसार नगर परिषदेकडे हस्तांतरित करून घेण्यात येणार आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!