
फलटण : श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजाबाबत विरोधकांकडून अनेक मुद्द्यांवर गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करतानाच विरोधकांनी केलेल्या आरोपांबाबत कागदोपत्री पुराव्यांसह माहिती देत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी वस्तुस्थिती पत्रकार परिषदेत मांडली.
फलटण येथील ‘सरोज व्हिला’ या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी श्रीरामचे विद्यमान चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हा. चेअरमन नितीन शाहुराज भोसले, संचालक संतोष खटके उपस्थित होते.
न्यायालयाच्या निर्णयानुसार विशेष साधारण सभा बोलावून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सभासदांसमोर जवाहरने आगामी काळात कारखाना चालविण्यास असहमती दर्शविल्याने यापुढे कारखाना चालविण्यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न केला तथापि कारखान्याचे ताळेबंद पाहिल्यानंतर जिल्हा बँकेने आर्थिक मदत करण्यास असमर्थता व्यक्त केली, बँकेच्या मदतीशिवाय कारखाना चालविणे अशक्य असल्याने न्यायालयात जाऊन ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगार व अन्य घटकांच्या हितासाठी श्रीराम कारखाना सुरु राहणे आवश्यक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत पर्यायांची माहिती देऊन त्याबाबत न्यायालयीन आदेशानुसार विशेष सर्वसाधारण सभा आणि खाजगी किंवा सहकारी कोणाही संस्थेला अथवा व्यक्तीला श्रीराम कारखाना चालविण्यास देण्याबाबत वृत्तपत्रात जाहिराती देऊन निविदा मागविण्यात आल्या विशेष साधारण सभेत या निविदांची माहिती दिल्यानंतर सभासदांनी श्री दत्त इंडियाने शेजारचा साखरवाडी कारखाना गेल्या काही वर्षात उत्तम पद्धतीने चालवून ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व अन्य घटकांना न्याय दिल्याची माहिती असल्याने सभासदांनी एक मुखाने दत्त इंडियाला सहमती दर्शविली आहे, त्यानंतर यांनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन या निर्णयाला स्थगिती घेण्याचा प्रयत्न केला, मुख्यमंत्र्यांनी ही त्याबाबत साखर आयुक्तांना काही निर्देश दिल्याचे समोर आले असल्याचे निदर्शनास आणून देत त्या पार्श्वभूमीवर आम्ही मुख्यमंत्र्यांची आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती समजावून दिली असल्याचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
जवाहर सहकारी साखर कारखाना किंवा दत्त इंडियाने अनुक्रमे श्रीराम व साखरवाडी कारखाना चालविताना ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांना ऊसाचा स्पर्धात्मक दर आणि नियमानुसार पुरेसे वेतन दिले आहे त्याचबरोबर कारखाना परिसरातील अन्य घटकांना हे दोन्ही कारखाने उत्तम पद्धतीने सुरु राहिले किंबहुना या दोन्ही कारखान्यांची गाळप क्षमता वाढल्याने शेतकरी, कामगार आणि सर्वच घटकांना त्याचा फायदा झाला असल्याने विशेष सर्वसाधारण सभेत सभासदांनी श्री दत्त इंडियाच्या निर्णयाला एकमुखी पाठिंबा दिला असल्याचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
श्रीरामच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, तोडणी वाहतूक ठेकेदार व अन्य घटकांचे कोणतेही नुकसान झाले नाही किंबहुना अन्य कारखान्यांच्या तुलनेत श्रीराम च्या माध्यमातून या सर्व घटकांना फायदाच झाला असल्याने केवळ राजकीय हेतूने श्रीराम संकटात कसा सापडेल, बंद कसा पडेल यासाठीचे प्रयत्न विरोधकांच्याकडून सुरु असल्याचा आरोप करीत शासनाने यामध्ये ठोस भूमिका घेऊन तातडीने निर्णय घ्यावा आणि सभासद शेतकरी कामगार व अन्य घटकांना न्याय द्यावा यासाठी आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती बाबत माहिती दिली आहे. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री व प्रशासन यंत्रणेची भेट घेऊन श्रीराम सुरु राहण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट शब्दात दिली.
जवाहरने प्रत्येक वर्षी एफ आर पी पेक्षा अधिक दर ऊस उत्पादकांना दिला असल्याने आणखी प्रति टन २०० रुपये ते कोठून देणार याचा विचार न करता संचालक मंडळाने यामधील मोठ्या रकमेचा लाभ करून घेतल्याचा आरोप बिनबुडाचा तर आहेच त्या पलीकडे केवळ राजकीय हेतूने लोकांची दिशाभूल करण्यात ही मंडळी प्रयत्नशील असल्याचा आरोप संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी केला.

