
फलटण : इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कंसिअसनेस तथा आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनामृत संघ (इस्कॉन) यांच्यावतीने फलटण येथे भव्य व आकर्षक ‘राधाकृष्ण’ मंदिराचे निर्माण करण्यात येणार असून या मंदिराच्या कामाचा कोनशीला समारंभ इस्कॉनचे संयुक्त राष्ट्रांकडून सन्मानित करण्यात आलेले जगप्रसिद्ध वक्ते श्रीमान गौरांग प्रभू यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती इस्कॉनचे पुणे केंद्राचे अध्यक्ष सुंदर वर दास यांनी पत्रकार परिषदेत दिली.
फलटण येथील इस्कॉन शाखेत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी इस्कॉन फलटणचे व्यवस्थापक अतुल गोविंद दास व इस्कॉन फलटणचे सदस्य राजेंद्र लोणकर यांची उपस्थिती होती.
गेल्या पंधरा वर्षांपासून फलटण येथे कार्यरत असलेल्या ‘हरे कृष्ण सेंटरचे’ आता स्वतंत्र केंद्र उभारण्यात येणार असून, शहरातील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील बाह्यवळण रस्त्यावर इस्कॉनच्या वतीने जागा घेण्यात आली आहे. या जागेवर भव्य व आकर्षक मंदिर, अन्नक्षेत्र तसेच गेस्ट हाऊस उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून सुंदर वर दास यांनी सांगितले की, जगभरात इस्कॉनची सुमारे तीन हजार मंदिरे असून, या मंदिरांच्या माध्यमातून कृषी केंद्रे, गोपालन, युवक प्रशिक्षण, बालसंस्कार व संस्कार वर्ग यांसारखे विविध उपक्रम राबविले जातात. पुणे येथील इस्कॉनच्या मुख्य केंद्राच्या मार्गदर्शनाखाली फलटणमध्ये हरे कृष्ण सेंटरच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षांपासून विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम सुरू आहेत. येथेही भारतीय संस्कृतीतील विविध सण व उत्सव उत्साहात साजरे करण्याबरोबरच बालसंस्कार वर्ग आणि युवकांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. आजच्या युवकांना ज्ञानाबरोबरच संस्कारांचीही आवश्यकता असल्याने ज्ञानासोबत संस्कार देण्याचा इस्कॉनचा प्रयत्न आहे.

फलटण येथील नव्या केंद्रासाठी घेण्यात आलेल्या जागेत सुमारे साडेनऊ गुंठे क्षेत्रावर मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. मंदिराच्या पुढील बाजूस सुमारे पाच गुंठे जागेत अन्नक्षेत्र उभारण्यात येणार असून, यासोबतच गेस्ट हाऊसचीही सुविधा निर्माण करण्याचे नियोजन आहे. आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्याच्या मार्गावर फलटण शहर असल्याने येथील अन्नक्षेत्रातून वारकऱ्यांची सेवा करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच जीवनावश्यक वस्तू, धार्मिक ग्रंथ, पूजेचे साहित्य आदी विविध वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मंदिराच्या कामाचा कोनशीला समारंभ शुक्रवार दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी इस्कॉनचे संयुक्त राष्ट्रांकडून सन्मानित करण्यात आलेले जगप्रसिद्ध वक्ते श्रीमान गौरांग प्रभू यांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे. ग्रामीण भागातही इस्कॉनचे केंद्र असावे, या उद्देशाने फलटणमध्ये केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. मंदिर उभारणीसाठी परिसरातील भाविकांचे सहकार्य, सहभाग व पाठबळ आम्हाला निश्चितपणे मिळेल, तसेच मोठ्या संख्येने भाविक इस्कॉनच्या फलटण केंद्राशी जोडले जातील, असा विश्वास व्यक्त करून इस्कॉनच्या केंद्रात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. इच्छुकांना येथे ज्ञानप्रबोधन, प्रसाद व विविध सेवांचा लाभ विनामूल्य घेता येणार असल्याचेही सुंदर वर दास यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘अन्नामृतचा’ उपक्रम फलटण केंद्रातही..!
भारत सरकारच्या शालेय पोषण आहार योजनेत इस्कॉनचे योगदान महत्त्वपूर्ण असून, इस्कॉनच्या ‘अन्नामृत’ ट्रस्टच्या माध्यमातून देशभरातील २२ ते २३ ठिकाणी सुमारे ३० लाख शालेय विद्यार्थ्यांना दररोज पोषण आहार पुरविला जात असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. हाच उपक्रम फलटण केंद्रातही सुरू करण्याचा इस्कॉनचा प्रयत्न असल्याचे सुंदर वर दास यांनी सांगितले.

