
फलटण : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) यांच्या वतीने फलटण येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. कोळकी येथील अनंत मंगल कार्यालयात शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता या सोहळ्यास प्रारंभ होणार असून, इस्कॉनचे संयुक्त राष्ट्रांकडून सन्मानित जगप्रसिद्ध वक्ते श्रीमान गौरांग प्रभू यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
हरे कृष्ण सेंटर, इस्कॉन फलटण यांच्या वतीने आयोजित या जन्माष्टमी सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह महाअभिषेक, भक्तिमय कीर्तन, प्रवचन, महाआरती आणि प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने फलटण व परिसरातील भाविकांना आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनुभव घेता यावा, तसेच श्रीकृष्णाच्या जीवनविचारांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात महाअभिषेक व महाआरतीसह भक्तिमय कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून, कार्यक्रमानंतर भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. फलटण शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीमान गौरांग प्रभू यांच्या प्रवचनाचा, महाआरतीचा तसेच प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

