
फलटण : गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप झालेल्या उसाचा दुसरा हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना संघटनेने निवेदन देत प्रति टन ५०० रुपये दुसरा हप्ता कारखाना सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी केली आहे. अन्यथा कारखाने सुरू करू देणार नाही, असा थेट इशारा सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर आणि फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर आणि तालुकाध्यक्ष नितीन यादव यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फलटण तालुक्यातील श्रीराम सहकारी साखर कारखाना (फलटण), स्वराज ॲग्रो प्रा. लि. (उपळवे), शरयू ॲग्रो प्रा. लि. (कापशी) आणि श्री दत्त इंडिया प्रा. लि. (साखरवाडी) या चारही कारखान्यांना निवेदने दिली आहेत. सदर निवेदनात म्हटले आहे की, फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत उसाला केवळ तीन हजार २०० रुपये प्रतिटन दर मिळाला आहे. मागील वर्षी कारखानदारांनी अतिरिक्त २०० रुपये देण्याचे मान्य केले होते. मात्र, यंदा साखरेचे दर वाढले असताना आणि कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणात साखर शिल्लक असतानाही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा योग्य दर मिळत नसल्याचा आरोप संघटनेने निवेदनात केला आहे. साखरेच्या वाढलेल्या दराचा विचार करता आणखी ३०० रुपये वाढ देणे आवश्यक असून, आधीचे २०० आणि नव्याने मागितलेले ३०० असे एकूण ५०० रुपये प्रतिटन शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्याच्या रूपाने मिळाले पाहिजेत, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. या पुढील आंदोलनाची दिशाही संघटनेने स्पष्ट केली आहे. ऊस वाहतूक बंद, साखर उचल बंद आणि कारखान्यांच्या गेटवर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कारखानदार आणि प्रशासनाची राहील, असे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.
निवेदन देते वेळी जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, युवक राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे, तसेच डॉ. रवींद्र घाडगे, किरण भोसले, विक्रम पवार, बाळासाहेब शिपुकले आणि अजित लाळगे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान स्वाभिमानी संघटनेने केलेल्या मागणीनुसार शेतकऱ्यांचा विचार करून ५०० रुपयांचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार की स्वाभिमानीच्या इशाऱ्यानुसार आगामी गळीत हंगामाच्या तोंडावर आंदोलनाचा भडका उडणार, याकडे फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
… तर कारखाने सुरु होऊ देणार नाही
स्वाभिमानीचे संघर्षशील नेते राजू शेट्टी यांच्या आदेशानेच आम्ही हे आंदोलन उभे केले आहे. शेतकऱ्याच्या घामाचे दाम मिळालेच पाहिजेत. साखरेचे भाव वाढले, कारखानदारांनी कोट्यवधी रुपये कमावले; मात्र शेतकरी वाऱ्यावर आहे. त्यामुळे कारखाना सुरू होण्यापूर्वी ५०० रुपये प्रतिटन शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणताही कारखाना सुरू होऊ देणार नाही,” असा इशारा धनंजय महामुलकर यांनी तालुक्यातील सर्व साखर कारखान्यांना दिला आहे.

