
फलटण : शिक्षण क्षेत्रात गेली दोन दशके समर्पित भावनेने कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या वडले (ता. फलटण) येथील संजीवनी संपत सोनवलकर यांना ग्लोबल इलाइट मीडिया टेक, पुणे यांच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुण्यातील सिम्बायोसिस ईशान्य ऑडिटोरियम, विमाननगर येथे झालेल्या दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा)चे संचालक राजीव नंदकर यांच्या उपस्थितीत सोनवलकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ग्लोबल इलाइट मीडिया टेकचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
संजीवनी सोनवलकर यांनी गेल्या २० वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात सातत्याने योगदान दिले आहे. त्यांनी पुण्यातील एस. पी. कॉलेजमधून B.Sc., शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, माळेगाव येथून B.Ed. तसेच पुणे विद्यापीठातून M.A., DSM चे शिक्षण पूर्ण केले आहे. अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल, वडवाडी येथे प्रिन्सिपल म्हणून कार्यरत असताना त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थिकेंद्रित उपक्रमांना विशेष प्राधान्य दिले.
सध्या त्या महात्मा फुले विद्यानिकेतन शिक्षण संस्थेच्या गगनगिरी इंग्लिश मीडियम स्कूल, संतोषनगर, कात्रज येथे प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यावर आणि व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला जात आहे.
समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देताना त्यांनी स्मार्ट क्लास, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग यांसारख्या आधुनिक शिक्षणपद्धतींचा प्रभावी वापर केला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शैक्षणिक उपक्रमांसोबतच क्रीडा, सांस्कृतिक आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली. त्यामुळे शिक्षण हे केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारे माध्यम बनावे, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
‘विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला संधी आणि त्यांच्या स्वप्नांना दिशा’ या भावनेतून काम करणाऱ्या संजीवनी सोनवलकर यांच्या शैक्षणिक योगदानाची राष्ट्रीय स्तरावर झालेली दखल हा फलटण तालुक्यासाठीही अभिमानाचा क्षण मानला जात आहे.
त्यांचे पती संपत सोनवलकर यांनी सावित्रीबाई फुले अध्यापिका विद्यालय, नायगाव (ता. खंडाळा) येथे अधिव्याख्याता म्हणून सेवा बजावली आहे. त्यांची कन्या डॉ. प्राची सोनवलकर (BAMS) असून चिरंजीव रोहन सोनवलकर हे सध्या अमेरिकेत अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’ प्राप्त झाल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंकरराव सोनवलकर, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक रतन माळी, अध्यक्षा स्मिता वाघ, सचिव रवींद्र वाघ, डॉ. दत्तात्रय सोनवलकर यांच्यासह वडले ग्रामस्थांनी संजीवनी सोनवलकर यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

