कमी पावसाच्या तालुक्यांत टँकरने मुबलक पाणीपुरवठा करा; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रशासनाला निर्देश; महिनाभरात बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्याचे नियोजन करावे

फलटण : यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने माण, खटाव, फलटण आणि कोरेगाव तालुक्यांत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक तसेच जनावरांना पिण्यासाठी टँकरद्वारे पुरेसा आणि मुबलक पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात कमी पाऊस झालेल्या तालुक्यांमध्ये करावयाच्या उपाययोजनांचा पालकमंत्री देसाई यांनी आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला.
टँकर सुरू असलेल्या ठिकाणी पाणीपुरवठा वेळेवर आणि सुरळीत होत आहे की नाही, तसेच ज्या जलस्रोतांमधून टँकरमध्ये पाणी भरले जाते, त्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पावसाळा संपण्यापूर्वी कमी पावसाच्या क्षेत्रातील सर्व बंधारे प्राधान्याने भरून घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. सध्या माण तालुक्यातील ६४ पैकी २९ बंधारे भरले आहेत. आगामी दहा दिवसांत माण तालुक्यातील उर्वरित सर्व बंधारे भरून घेण्यात यावेत. त्यानंतर खटाव तालुक्यातील बंधारे भरण्याचे काम हाती घ्यावे. येत्या महिनाभरात संबंधित सर्व भागांतील बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घेऊन पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे, असे निर्देश देतानाच सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी नागरिक तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच पिकांची नजर पाहणी करून टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क राहावे, अशा सूचनाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिल्या.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!