
फलटण : शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे, हा त्यांच्या कार्याला नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारा क्षण असतो, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर यांनी केले.
विडणी ता. फलटण येथील उत्तरेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, संस्थेचे अध्यक्ष हणमंत अभंग, उपाध्यक्ष डॉ. सुचिता शेंडे, सचिव राजीव पवार, डॉ. किरण शेंडे, विठ्ठल नाळे, मारुती नाळे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्राचार्य शुभांगी शिर्के, संतु पिचड आणि जिल्हा परिषद शिक्षक बापुसो बोराटे यांना संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. पुरस्कारामुळे शिक्षकांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहन मिळत असून, अशा सन्मानातून शिक्षण क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते, अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमात संस्थेतील माजी व सेवानिवृत्त शिक्षकांचाही यथोचित सन्मान करून त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव करण्यात आला. आपल्या प्रदीर्घ सेवेतून विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणाऱ्या या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी पुरस्कारप्राप्त शुभांगी शिर्के, संतु पिचड आणि बापुसो बोराटे यांनी मनोगते व्यक्त करून संस्थेने केलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

