
फलटण : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील ८३० गावांमधील ३ हजार ८३९ पात्र लाभार्थ्यांची तिसरी यादी ११ सप्टेंबर २०२६ रोजी शासनाच्या पोर्टलवर आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २ हजार ५९२, तर राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांच्या १ हजार २४७ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
लाभार्थ्यांची गावनिहाय यादी संबंधित ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा संस्था, बँक शाखा तसेच उपनिबंधक व सहाय्यक निबंधक कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आपले नाव यादीत आहे की नाही, याची खात्री करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत ३१ मार्च २०२६ पर्यंतची पात्र कर्जथकबाकी माफ करण्यात येणार असून, १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज व इतर खर्चही माफ केले जाणार आहेत. राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांच्या ज्या शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची थकबाकी २ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांचे कर्जही शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार पूर्णपणे निरंक करण्यात येणार आहे.

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी उपलब्ध नाही, त्यांनी प्रथम फार्मर आयडी काढून घेणे आवश्यक आहे. यापूर्वीच्या यादीतील ३ हजार १८७ प्रलंबित शेतकरी तसेच तिसऱ्या यादीतील ३ हजार ८३९ लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
कर्जमुक्तीच्या या प्रक्रियेमुळे पात्र शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून, आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

