
फलटण : आगामी काळात शिवसेना व आघाडीच्या माध्यमातून फलटणसह सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सर्व प्रश्न निश्चितपणाने सोडविले जातील. आपण फलटणच्या स्वाभिमानासाठी व लाडक्या बहीणी व भावांच्या उज्वल भविष्यासाठी, फलटणकरांना भयमुक्त, दहशत मुक्त, सुरक्षित फलटण देण्यासाठी आलो येथे आलो आहोत. छ. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या या भूमीत ने आगामी काळात शिवसेना व आघाडीच्या माध्यमातून फलटणसह सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सर्व प्रश्न निश्चितपणाने सोडवू, या भूमीत छत्रपतींचा भगवा झेंडा डौलाने फडकला पाहिजे यासाठी शिवसेना मित्रपक्ष व आघाडीचे सर्व उमेदवार विजयी करा असे आवाहन करत नगरपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून एक संधी द्या, त्या संधीचे सोने केल्या शिवाय आम्ही राहणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिली.
फलटण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मधील शिवसेना, कृष्णा भीमा विकास आघाडी व राष्ट्रीय काँग्रेस नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ॲड. अनिकेत राजे नाईक निंबाळकर व त्यांचे सहकारी २७ नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत अध्यक्ष स्थानावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. महेश शिंदे, मा. आ. दीपक चव्हाण, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, अनिकेतराजे नाईक निंबाळकर, विश्वजितराजे नाईक निंबाळकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, जेष्ठ नेते महादेवराव पवार, माजी नगराध्यक्षा नीता नेवसे, आदिसह शिवसेना व आघाडीचे सर्व उमेदवार यांची उपस्थिती होती.

शिवसेनेचा भगवा रंग हा विकासाचा, प्रगतीचा आणि समृद्धीचा आहे तुम्ही धनुष्यबाणावर मतदान करा फलटणच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझी असल्याचे सांगत, अनुभवी, प्रगल्भ, विधायक आणि विकासाची दृष्टी असलेले संयमी नेतृत्व आ. रामराजे यांच्या रुपाने लाभल्याने, आगामी काळात शिवसेना व आघाडीच्या माध्यमातून फलटणसह सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सर्व प्रश्न आपण निश्चितपणाने सोडवू असे स्पष्ट करून उपमुख्यमंत्री म्हणाले, शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून राजघराणे जिल्ह्याच्या राजकारण आणि समाजकारणात उतरल्याने या आघाडीच्या माध्यमातून आणि आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या साथीने या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यात आपण कोठेच कमी पडणार नाही. राज्यातील आघाडीचे सरकार हे गोरगरिबांचे त्यांना न्याय देणारे सरकार असून सर्वसामान्यांवर अन्याय करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ॲड. अनिकेतराजे आणि त्यांच्या संपूर्ण पॅनलला मोठ्या मताधिक्याने विजयी करा हे सांगण्यासाठी आपण फलटणला आलो आहोत. येथील नगरपरिषदेची सत्ता हातात आल्यानंतर इथला सर्वांगीण विकास, प्रलंबित सर्व कामांची पूर्तता आणि तुम्हा सर्वांची सुरक्षितता ही माझी जबाबदारी असेल असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. या सभेच्या निमित्ताने लोटलेला अफाट जनसागर पाहता ही सभा म्हणजे परिवर्तनाची नांदी असल्याचे सांगून आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी सुरु केलेले विकास पर्व आपल्याला ॲड. अनिकेतराजे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून पुढे न्यायचे आहे. आ. रामराजे हे अनुभवी नेते आहेत. त्यांच्या मनात मला काय मिळेल, माझ्या परिवाराला काय मिळेल, यापेक्षा या राज्याला काय मिळेल, या फलटणला काय मिळेल हा विचार असल्याने ज्याप्रमाणे मी धाडसी निर्णय घेतला तसाच धाडसी निर्णय रामराजे यांनी देखील घेतला, त्यामुळे त्यांचे आपण मनापासून अभिनंदन करतो. शिवसेना व मित्र पक्षांच्या माध्यमातून फलटण नगर परिषद निवडणुकीत उभे असलेले संपूर्ण पॅनल मोठ्या मताधिक्याने विजयी करा फलटणच्या विकासाची जबाबदारी माझ्यावर सोपवा त्यामध्ये आपण कधीच कमी पडणार नाही याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी पुन्हा पुन्हा दिली.

मंत्र्यांना थेट फोन व धडक निर्णय..!
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री म्हणून फलटणकरांच्यावतीने ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे सुरवडी औद्योगिक वसाहतीचा विस्तार, फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयाचा विस्तार व सध्या ५० बेडचे असलेले हे रुग्णालय १०० बेडचे करण्याची मागणी, शहरात खाजगी व शासकीय जमिनीवर असलेल्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन व तेथील रहिवाशांना कायमस्वरुपी पक्की घरे बांधून देणे, हडको वसाहत करार संपल्याने तेथील रहिवाशांसाठी नव्याने ९९ वर्षाचा करार करुन देणे, शहरासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र व सर्व वीजवाहिन्या भूमिगत करणे, शहरात सेफ सिटी अंतर्गत वाहतुकीचे योग्य नियोजन त्यासाठी शहरात काही ठिकाणी उड्डाणपूलांची उभारणी त्याचप्रमाणे शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे वगैरे मागण्या शहरवासीयांच्यावतीने करण्यात आल्या. त्याबाबत आचारसंहिता संपतात योग्य निर्णय घेऊन संबंधित मंत्री आ. रामराजे आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या उपस्थितीत फलटण येथे बैठका घेऊन या प्रश्नांची सोडवणूक करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दात दिली.
दरम्यान फलटण उपजिल्हा रुग्णालय आणि औद्योगिक वसाहत विस्ताराबाबत आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांना जाहीर सभेतूनच दूरध्वनी द्वारे संपर्क करुन फलटणकरांच्या मागणीची कल्पना देत याची पूर्तता करण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंत्र्यांना कल्पना दिली, तेव्हा संबंधित मंत्र्यांनी या बाबत लवकरच फलटण येथे आ. रामराजे यांच्या उपस्थितीत फलटण येथे आपण स्वतः बैठक घेऊ व हे प्रश्न मार्गी लावू असे सांगितले तेव्हा उपस्थितांमधून मोठा जल्लोष व्यक्त करण्यात आला.
