
फलटण : बुद्धिमत्ता हे आपणास मिळालेले एक नैसर्गिक वरदान आहे. औपचारिक व अनौपचारिक शिक्षणामुळे आपल्या बुद्धीचा विकास होत असतो. या कामी घर, गाव, समाज, शाळा व सभोवतीचा परिसर हे घटक परिणामकारक ठरतात. आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर आपण कोणत्याही परीक्षेत किंवा स्पर्धेत यश संपादन करू शकतो मात्र बुद्धिमत्तेला नैतिक मूल्यांची जोड मिळाली तर आपले जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी होते असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालय मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. अशोक शिंदे यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक संघ, फलटण यांच्यावतीने आयोजित फलटण शहरातील काही विद्यालयातील दहावीमध्ये मराठी, गणित व वर्गात सर्वप्रथम येऊन विशेष प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हिरालाल गांधी, उपाध्यक्ष अजित शेंडे व सचिव रवींद्र येवले हे मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ. शिंदे म्हणाले, वेळेचे उत्तम नियोजन, परीक्षा बरहुकूम सातत्यपूर्ण अभ्यास, आई वडील आणि गुरुजनांचे मार्गदर्शन आणि चिकाटी या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत आपणास प्राविण्य प्राप्त करता येते. कुशाग्र बुद्धीमत्तेचा उपयोग केवळ व्यक्तिगत विकासासाठी नव्हे तर सामाजिक, राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील कार्यासाठी झाला पाहिजे. माता-पिता, गुरुजन आणि राष्ट्र या प्रती कृतज्ञता, प्रेम, आदर, निष्ठा आणि सन्मान राखणे हे आपले प्रथम कर्तव्य असले पाहिजे. आपले जीवन सार्थकी लावण्यासाठी आपण नैतिकतेसाठी सदैव आग्रही आणि प्रयत्नशील असायला हवे. जीवनाला योग्य दिशा, आकार आणि आधार देण्याचे सामर्थ्य नैतिक मूल्यांमध्ये असते असे ठाम मत त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्याचबरोबर डॉ. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सुसंस्कार, सुशिक्षण, सुसंगती, प्रामाणिकता, श्रमप्रतिष्ठा आणि संघर्ष याबाबत विविध बोधकथांच्या आधारे महत्त्व पटवून दिले. तसेच पुढील आधुनिक माहिती व तंत्रज्ञान युगात विविध शैक्षणिक, सामाजिक आणि व्यावसायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी सदैव प्रयत्नशील, जागरूक आणि अद्ययावत राहण्याचाही सल्लाही विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचा प्रारंभ साने गुरूजींच्या ‘खरा तो एकची धर्म’ या सामुहिक प्रार्थनेने झाला. यावेळी मुधोजी हायस्कूलच्या अनुष्का सपाटे, आर्या साळुंखे, स्नेहा नाळे, अमन मनेर, संस्कार सरक, पीयूष दोशी, आयमान शेख तसेच वेणूताई चव्हाण हायस्कूलच्या फिजा शेख व प्रतिक्षा सरक या विद्यार्थ्यांना डॉ. अशोक शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी हिरालाल गांधी व मरुदेवी गांधी या जेष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.
संस्थेचे सचिव रवींद्र येवले यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक तर उपाध्यक्ष अमित शेंडे यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. संघाचे ज्येष्ठ सदस्य भालचंद्र ताथवडकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. या कार्यक्रमास प्राविण्य प्राप्त विद्यार्थी, त्यांचे पालक व जेष्ठ नागरिक संघाचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.
