फलटणमध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

फलटण : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी येथील महात्मा फुले चौकातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी या परिसरात करण्यात आलेली सजावट व महात्मा फुले यांच्या हस्ते ग्रंथ वितरण करतानाचा थ्री डी इफेक्ट फोटो पॉईंट व संध्याकाळी काढण्यात आलेली शोभायात्रा फलटणकरांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली.
सकाळी प्रथम महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्ध पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. सदर रॅलीमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. यानंतर महात्मा फुले यांच्या पुतळ्याला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते, कोळकीचे माजी सरपंच दत्तात्रय शिंदे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले.

या वेळी महात्मा फुले चौकात करण्यात आलेली सजावट लक्षवेधी होती. महात्मा फुले यांच्या हस्ते गुलामगिरी हा ग्रंथ वितरित करीत असतानाच थ्री डी फोटो पॉईंट मोठे आकर्षण ठरला. महात्मा फुले यांच्या हस्ते ग्रंथ स्विकारतानाचा फोटो काढण्यासाठी येथे दिवसभर मोठी गर्दी होती. सायंकाळी पाच वाजता पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या हस्ते जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. त्यानंतर फलटण शहरातील प्रमुख मार्गावरून नेत्रदीपक आतषबाजीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित असणारे व समाज प्रबोधन करणारे चित्ररथांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!