
फलटण : फलटण शहर व तालुक्यातील ५०० ते १५०० स्क्वेअर फुटापर्यंत केवळ निवासी अतिक्रमणे शासन निर्णयानुसार नियमित केली जाणार आहेत. गावोगावीची अतिक्रमणे नियमित करताना प्रशासनाने आमदारांना विश्वासात घेऊन काम करावे, आमदार सचिन पाटील यांनी कोणत्याही अतिक्रमण धारकाचे नुकसान होणार नाही यासाठी सतर्क राहावे अशा सूचना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्या.
फलटण पंचायत समिती येथे आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली फलटण शहर व तालुक्यातील १ जानेवारी २०११ पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमित करण्या संदर्भात आयोजित प्रशासकीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या जिजामाला नाईक निंबाळकर, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले यांच्यासह पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, नगरसेविका व प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.
शासन निर्णयानुसार केवळ निवासी अतिक्रमणे नियमित केली जाणार आहेत. या या निर्णयाची फलटण शहर व तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या सर्व यंत्रणांनी सकारात्मक सहभाग नोंदवावा, विशेषत: भूमीअभिलेख विभागाने यासाठी तातडीने मोजणीचे कामकाज करावे, प्रसंगी खाजगी मोजणीदार यांनाही या प्रक्रियेत मदतीला घ्यावे त्याचबरोबर शहरातील ओपन स्पेस अधिकृतरित्या नगरपालिकेच्या नावावर करण्यात यावेत. तालुक्यातील जनतेला अधिकाधिक निवासी अतिक्रमणे मोहिमेचा लाभ मिळावा यासाठी पारदर्शकपणे सर्वच यंत्रणांनी काम करावे असे आवाहन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले.
नागरिकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण शासनास कळवावे, शासन त्यामध्ये नक्कीच मार्ग काढेल. अतिक्रमणामुळे गावात व शहरात वाद-विवाद होतात ही अतिक्रमणे नियमित करण्यासाठी शासनाने चांगला निर्णय घेतला आहे. त्याचा जास्तीत जास्त लाभ अतिक्रमणधारकांना मिळावा. नियमापेक्षा जास्त अतिक्रमण असेल तर ते काढल्याशिवाय लाभ मिळणार नाही. या काळात कामकाजात कोणत्याही विभागाकडून हलगर्जीपणा झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही असा इशारा आमदार सचिन पाटील यांनी यावेळी दिला.
फलटण शहरात झोपडपट्टीमध्ये जी अतिक्रमणे आहेत. त्यातील काही अतिक्रमणधारक आपली अतिक्रमणे सोडून अन्यत्र फ्लॅटमध्ये रहात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरातील अतिक्रमणाबाबत निर्णय घेताना नगरसेवक व नगरपालिका कर्मचाऱ्यांची जबाबदारी वाढवून त्यांच्या माध्यमातून पारदर्शक व काटेकोरपणे कामकाज करावे लागणार आहे.
समशेरसिंह नाईक निंबाळकर
नगराध्यक्ष, फलटण

