
फलटण : सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील धरणामधील पाणीसाठा वाढला आहे. महाराष्ट्राचे भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाची प्रकल्पीय क्षमता १०५.२५ टीएमसी असून ७ जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंत कोयना धरणात ३५.७१ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ३३.९३ टक्के भरले असून धरणातील आवक ९३ हजार क्युसेक्सने होत आहे, अशी माहिती सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.
मंगळवार दि. ७ जुलै अखेर जिल्ह्यात २८८.७ मि.मी. पर्जन्यमान झाले असून पावसामुळे नदी, नाले, ओढे दुथडी भरुन वाहत आहेत.
महाबळेश्वर महसूल मंडळामध्ये सर्वाधिक ३९२.८ मि.मी. पाऊस
७ जुलै रोजी सातारा जिल्ह्यात २२ महसूल मंडळांमध्ये ६५ मि.मी. पेक्षा जास्त पर्जन्यमान झाले आहे. यामध्ये महाबळेश्वर महसूल मंडळामध्ये सर्वाधिक म्हणजेच ३९२.८ मि.मी. पाऊस झाला आहे. त्या खालोखाल लामज, बामणोली, तापोळा या महसूली मंडळांमध्ये १६९ मि.मी. पाऊस झाला आहे. तर वाठार १४८.५ मि.मी., करहर आणि केळघर या दोन ठिकाणी १२४.५ मि.मी., पाचगणी १३६.५ मि.मी., पसरणी ११०.३ मिमी., पाटण १००.५ मि.मी.
जिल्ह्यातील ९० नागरिकांचे स्थलांतर
महाबळेश्वर तालुक्यातील नावली येथील ७, धावली येथील १७ आणि रुळे येथील ८ अशा एकूण ३२, जावली तालुक्यातील बहुले येथील २३ आणि बोंडारवाडी येथील ८ अशा ३१, वाई तालुक्यातील जांभळी येथील २२ आणि डोईचीवाडी येथील ५ अशा २७ तर एकूण ९० नागरिकांचे अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, नातेवाईक, मंदिरे आदी सुरक्षीत ठिकाणी तात्पुरते स्थलांतरण करण्यात आले आहे.
जिल्ह्यात ८३ घरांची पडझड
पाटण तालुक्यातील ३९, सातारा तालुक्यातील ९, खंडाळा तालुक्यातील २, जावली तालुक्यातील ११, वाई तालुक्यातील १३, महाबळेश्वर तालुक्यातील ९ अशा एकूण ८३ घरांची पडझड झाली आहे. या घरांच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सातारा तालुक्यातील केरी येथील प्राथमिक शाळेचे पत्रे उडाल्यामुळे तर खंडाळा तालुक्यातील मिरजे येथील प्राथमिक शाळा व स्मशानभूमीचे भिंत पडून नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सखोल भागात पाणी साचणाऱ्या व धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्यातील धरणांची सद्यस्थिती पुढील प्रमाणे :
मंगळवार दि. ७ जुलै रोजीचा एकूण पाणीसाठा, कंसात प्रकल्पीय एकूण क्षमता टीएमसीमध्ये आणि एकूण टक्केवारी.
कोयना – ३५.७१ टीएमसी (१०५.२५ टीएमसी,) टक्केवारी ३३.९३ टक्के, धोम – ६.५९ टीएमसी (१३.५ टीएमसी,) टक्केवारी ४८.८१ टक्के, धोम-बलकवडी- २.१७ टीएमसी (४.०८ टीएमसी,) टक्केवारी ५३.१९ टक्के, कण्हेर – ६.२९ टीएमसी (१०.१० टीएमसी,) टक्केवारी ६२.२८ टक्के, उरमोडी – ४.५० टीएमसी (९.९६ टीएमसी,) टक्केवारी ४५.१८ टक्के, तारळी – १.७३ टीएमसी (५.८५ टीएमसी,) टक्केवारी २९.५७ टक्के.
दरम्यान पावसामुळे झाड कोसळने, दरड कोसळने, रस्ता खचणे असे प्रकार होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अशा वेळी यंत्रणांनी सजग राहून तात्काळ कार्यवाही करावी व रस्ते वाहतुकीसाठी खुले करावेत. धोकादाय ठिकाणी दरड प्रवण क्षेत्रांमध्ये नागरिकांच्या सुरक्षतेला प्राधान्य देत तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत.

