
फलटण : गत विधानसभा निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांची निष्क्रियता व दुर्लक्ष यामुळे आपणास पराभवाचे तोंड पाहावे लागले. फलटण तालुक्यात नेहमीच गटातटाचे राजकारण राहिले आहे. आपला मूळ पक्ष हा अपक्षच आहे. पक्षीय बांधिलकीपेक्षा गटाला महत्त्व असल्याचे सूचित करून आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही असे आपण म्हणत नसल्याचे सांगत भविष्यातील निर्णयाची दिशा पुन्हा एकदा गुलदस्त्यात ठेवून सत्तेचा गैरवापर करून आम्ही कधीही विरोधकांच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला नाही, ते आमचे संस्कार नाहीत असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक अनंत मंगल कार्यालय कोळकी ता. फलटण येथे संपन्न झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार दीपक चव्हाण, बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेविका सुभद्राराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीराम चे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, मिलिंद नवसे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
अगामी काळातील राजकीय भूमिकेबाबत व कार्यकर्त्यांच्या मनस्थितीबाबत बोलताना आ. रामराजे म्हणाले, आपला मूळ पक्ष हा अपक्षच आहे. आपल्या तालुक्यात पक्ष गौण आहे. पक्षीय बांधिलकीपेक्षा गटाला महत्त्व असल्याचे सूचित करून. अगामी काळात आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही असे नाही. कोणत्या पक्षात जायचे हे मी ठरवेन, त्याबाबत मला कळते गेली ३० वर्षे मी मुंबईच्या चौपाटीवर लाटा मोजत बसलो नव्हतो. गत विधानसभा निवडणूकितीला पराभवबाबत व नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले, कार्यकर्त्यांना आता बोटचेपी भूमिका घेऊन चालणार नाही त्यांना आक्रमक बनल्याशिवाय आता पर्याय नाही. विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला. पैसे वाटप करीत असताना त्यास विरोध करणे आवश्यक होते, परंतु आपल्या कार्यकर्त्यांकडून तसे झाले नाही. आगामी निवडणुकांमध्ये मात्र असे करून चालणार नाही कार्यकर्त्यांना पाय रोवून उभे राहावे लागणार आहे. आम्ही लढण्यासाठी खंबीर आहोत मात्र सैन्य पळपुटे असून चालणार नाही. अगामी निवडणुका केवळ आपल्याच नव्हे तर जनतेसाठी देखील अस्तित्वाची व शांततेने जगण्याची लढाई बनली आहे. आज कार्यकर्ता म्हणून तुम्हाला त्रास होतोय, उद्या नागरिक म्हणून हा त्रास तुम्हाला भोगावा लागणार आहे, असे निदर्शनास आणून देत मला न घाबरणारा कार्यकर्ता अपेक्षित आहे. वाटेल ते करण्यासाठी आम्ही तयार आहोत, आम्ही तुमच्यासाठी तुरुंगात जाऊ, पण तुम्ही मागे हटता कामा नये अशी अपेक्षा रामराजे यांनी कार्यकर्त्यांकडून यावेळी व्यक्त केली. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागण्याचे आवाहन करत, आगामी काळात पाय रोवून गावात उभे राहण्याचा शब्द त्यांनी कार्यकर्त्यांकडून घेतला. त्यावर मोठ्या संख्येने हात वर करून कार्यकर्त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला.
मेळाव्यास फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील गावोगावीचे सरपंच सोसायटीचे चेअरमन राजे गटाचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

