
फलटण : फलटण शहराचे ग्रामदैवत प्रभू श्रीरामाची संस्थानकालीन परंपरा असलेली राम यात्रा व रथोत्सव आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आज सकाळी आठ वाजता नगर प्रदक्षणेसाठी मार्गस्थ झालेला रामरथ दिवसभर फलटण शहरातून पारंपरिक मार्गांवरून नगर प्रदक्षणा करून सायंकाळी आठच्या सुमारास परत श्रीराम मंदिरात पोहचला. नगरप्रदक्षणेच्या कालावधीत प्रभू श्रीरामचंद्राच्या नामाचा जयघोष करीत भक्तीभावाने हजारो भाविकांनी रामरथाचे मनोभावे दर्शन घेतले.
आज सकाळी सकाळी ७ ते ८ या वेळेत श्रीराम मंदिरात हभप खोमणे महाराज यांचे कीर्तन झाल्यानंतर राजघराण्यातील सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अनिकेतराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजितराजे नाईक निंबाळकर, अजयसिंहराजे नाईक निंबाळकर आदी मान्यवरांच्या हस्ते प्रभू रामचंद्राची मूर्ती रथामध्ये ठेवण्यात आल्यानंतर रथ सोहळा परंपरागत पद्धतीने शहरातील रथ मार्गावरुन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरुन फिरुन सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास रथ सोहळा श्रीराम मंदिरात परत पोहचला. रामरथ नगर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ होण्यापूर्वी रथाचे स्वागत महसूल प्रशासनाच्या वतीने तहसीलदार डॉक्टर अभिजीत जाधव यांनी केले. रथाच्या प्रदक्षिणामार्गावर ठिकठिकाणी सडासंमार्जन करून आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, ठिकठिकाणी फटाकड्यांच्या आतषबाजीत रथाचे स्वागत करण्यात आले. भाविक प्रभू श्रीरामचंद्राच्या नामाचा जयघोष करीत भक्तीभावाने रामरथाचे पानफुलांची उधळण करीत मनोभावे दर्शन घेत होते. यावेळी रथा पुढील मानांच्या अश्वांचे देखील भाविकांनी दर्शन घेतले. रामरथ फलटण शहरातील बादशाही मशीद, शिंपी गल्ली, रविवार पेठ, छ.शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आल्यानंतर प्रशासनाच्या व फलटण नगरपालिकेच्या वतीने रथाचे स्वागत प्रांत अधिकारी प्रियंका आंबेकर तहसीलदार डॉक्टर अभिजीत जाधव व मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले.

त्यानंतर महावीर स्तंभ, उपळेकर महाराज समाधीमंदिर मार्गे दुपारी १२ वाजता महात्मा फुले चौकात पोहचला. दुपारी मारवाड पेठ, रंगारी महादेव मार्गे रथ बाणगंगा नदीपात्रात उतरला असता पंचक्रोशीतून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मलठणमधील सद्गुरू हरिबुवा समाधी मंदिर ट्रस्टतर्फे रथाचे स्वागत करण्यात आले. तेथून पाचबत्ती चौक, रविवार पेठ, छ.शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, उमाजी नाईक मार्गे सायंकाळी आठच्या सुमारास रथ राम मंदिरात पोहचला. संध्याकाळच्या सुमारास फलटण शहर व तालुक्यातील गावोगावी चे भावी तसेच इतर जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या गर्दीने राम रथाचे दर्शन घेतले.

रामरथाच्या निमित्ताने आज फलटण शहरात लागलेली विविध खेळण्याची, साहित्याची, मेवा मिठाई, खेळणी, सौदर्य प्रसाधने, शोभेच्या वस्तू आदी दुकाने गर्दीने फुलून गेली होती. यावेळी लावण्यात आलेले पाळणे लक्ष वेधून घेत होते यामध्ये बसण्यासाठी देखील मोठी गर्दी झाली होती. एकंदरीत राम यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण शहरभरात उत्साहाचे वातावरण होते.
दरम्यान आज शनिवार दि.२२ नोव्हेंबर रोजी श्रींची पाकाळणी, सकाळी काकड आरती आणि नंतर श्रीरामास ११ ब्राम्हणांचा लघुरुद्र व महापूजा झाले नंतर कीर्तन होईल व त्यानंतर या यात्रेची सांगता होणार आहे.
