२०२५ चे वर्ष मावळताना आणि २०२६ ची नवी पाहट उगवताना, सुदृढ आरोग्याचा संकल्प आचरणात आणूया : डॉ. प्रसाद जोशी

मागील वर्षाकडे वळून पाहताना, अधिक सुदृढ आणि सशक्त होईन रे शरीरा आणि मना !!
वर्षाच्या शेवटी नेहमीच असे वाटते की हे वर्ष फार भरभर गेले. मागे वळून पाहताना या वर्षातील घडामोडी डोळ्यासमोरून जातात. काय गमवले, काय मिळविले आणि आपल्या जीवनाच्या टप्यावर कुठे येऊन पोहोचलो आहे याचा एक मागोवा घेणे गरजेचे.
अस्थिरोग शल्य चिकित्सक म्हणून मला इथे प्रकर्षाने सांगायचे आहे की आपणच आपल्या आरोग्याची पुरती वाट लावलेली आहे . व्यायामाचा अभाव , बैठी जीवनशैली , मानसिक ताणतणाव  आणि नको-त्या  सवयी लावून आपणच आपले आरोग्य वेशीवर टांगले आहे.
‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा स्वामी’ हे पक्के लक्षात असुदेत. जे आजार पन्नाशी-साठीत व्हायचे ते आता विशी-तिशीतच होताना दिसत आहेत. तरुण पिढी व्याधींनी ग्रासलेली दिसते आहे . याला आपण आणि आपली जीवनशैलीच जबाबदार आहे असे तुम्हाला नाही का वाटत ?
या नवीन वर्षाचे म्हणजेच २०२६ चे स्वागत आपण शरीराने आणि मनाने आणखीन सुदृढ होण्याचा संकल्प सोडून करूयात असे मला नक्कीच वाटते ! नुसता संकल्प करून चालणार नाही, तो आचरणात आणला पाहिजे आणि अगदी आजपासून बरका !
आजपासून काय कराल …..

१. रोज सकाळचा सूर्योदय बघाल
उगवत्या सूर्या कडे बघितले की एक वेगळाच आनंद आणि ऊर्जा मिळते यात काही शंकाच नाही . पूर्ण दिवस अगदी आनंदात जातो .करून बघा आणि स्वतःच त्या आनंदघनात सामावून जा !
सूर्य उगवल्या नंतर एक तासाच्या आत सूर्य किरणे अंगावर घेतलीत तर Natural Vitamin D आपल्या शरीरात त्वचेच्या आत तयार होते आणि मग बरेच आजार टाळतात जसे की Osteoporosis, Calcium deficiency आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम सुध्दा टाळता येतात.

२. रोज आणि नित्यानियमने अर्धा ते एक तास व्यायाम कराल
तो स्वतःसाठी करायचा आहे , दुसऱ्याला दाखविण्यासाठी नाही. प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते, ती ओळखून आपण रोज व्यायाम केला पाहिजे. सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासने, चालणे, पळणे, सायकलिंग, पोहणे अथवा अन्य कुठलाही खेळ खेळणे असो.
Flexibility , Streching , Strengthening आणि Aerobics याचा योग्य समन्वय साधणे गरजेचे आहे. व्यायमामध्ये विविधता पाहिजे नाहीतर मग रोज तेच तेच करून कंटाळा येतो.

३. शुद्ध, सात्विक आणि शाकाहारी आहार घ्या
आपले शरीर आणि पचनसंस्था ही मांसाहारी साठी बनलेली नाही. मांसाहाराने फक्त जिभेचे चोचले पुरवले जातात आणि मग शरीराला अपचन झाल्याने दुष्परिणाम भोगावे लागतात.
घरी बनवलेले शुद्ध, सात्विक आणि शाकाहारी अन्न घेणे केव्हाही आरोग्यदायीच ठरते. त्यामुळे बाहेरील जंक फुड्स टाळलेलेच बरे नाही का ?

४. सहा ते सात तास रात्री शांत झोप घ्या
लवकर झोपे आणि लवकर उठे त्याला आरोग्य आणि समाधान लाभे !
बिछान्यावर पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे असे सर्वांनाच वाटते पण अशी सुखाची झोप किती लोकांच्या वाट्याला येते ! ती यावी म्हणून आपण किती प्रयत्न करतो, हे आपणच आपल्याला विचारा ! झोप ही शरीराला अत्यंत आवश्यक असते. रात्रीच्या शांत झोपेने शरीर आणि मन ताजे तवाने आणि टवटवीत होते. एक नवी उमेद आणि नवीन ऊर्जा येते आणि शरीराची energy conserve होते.

५. मनाची मशागत कराल
मन करारे प्रसन्न. मन आनंदी असेल तर कुठल्याही कामाचा ताण येत नाही.
शेवटी सगळाच “Mind Game” असतो.
Take it Easy, Make it Easy. कुठल्याही आजाराची उत्पत्ती मनामधूनच होते असे शास्त्रांनी सुद्धा सिद्ध केले आहे.
ज्याची Will Power उत्तम तो कुठल्याही संकटाला सामोरे जाण्यास तयार असतो.
त्यामुळे मन शांत आणि प्रसन्न ठेवण्यासाठी Meditation महत्त्वाचे ठरते. आपण कोण आहोत, या जगात का आलो आहोत आणि आपल्याला कुठे जायचे आहे याचे आत्मपरीक्षण सर्वांनीच केले पाहिजे. दुसऱ्याच्या आयुष्याशी आपली तुलना नको. त्याचे वरवरचे सुखविलास पाहून मत्सरग्रस्त होऊ नका. तो आतून काय ‘भोगतोय’, काय ‘सोसतोय’ ते तुम्हास कोठे ठाऊक आहे ? क्षमा शस्त्र ज्याचे हाती त्यास काय तोटा? आनंदाच्या वाटा शोधा आनंदाच्या वाटा !…क्षमाशील झालात की सुखाची रांगोळी आपल्याच दारात !…
दुःखाचे, तणावाचे दिवस आहेत ? संपतील राजा ! परिस्थिती कायम बदलत राहाते. लाल सिग्नल नंतर हिरवा येतोच की !
हे जीवन फार छोटे आहे. दुसऱ्याचा हेवा, मत्सर, द्वेष करण्याइतके खचितच मोठे नाही.
नवीन वर्षात अजून बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत पण बस एवढ्या पाचच गोष्टी या नवीन वर्षात नित्यानियमनी करा. बघा आयुष्य कसे बदलून जाते ते !!
आजार झाल्यावर निस्तरण्यापेक्षा तो होऊच नये !!
बरोबर ना…
‘मग निरामय भरित । पावती पद अच्युत ।
हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आरोग्यदायी आणि निरामय जाओ हीच प्रभू राम चरणी प्रार्थना !!
जय श्रीराम.

आपला आरोग्य अभिलाषी,
डॉ प्रसाद जोशी, फलटण

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!