
फलटण : भारतीय शेतीला शाश्वत, पर्यावरणपूरक आणि विज्ञानाधारित उपाय उपलब्ध करून देण्याच्या दिशेने के. बी. बायो ऑर्गेनिक्स प्रा. लि. यांनी महत्त्वपूर्ण पाऊल टाकत ‘मायकोरिस’ (Mycorrhiza Bio-Fertilizer) हे नवे जैवखत बाजारात सादर केले आहे. सदर जैव खताचे उत्पादन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सचिन यादव यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
अत्याधुनिक ROC (Root Organ Culture) तंत्रज्ञानावर आधारित हे उत्पादन पिकांच्या मुळांच्या आरोग्याबरोबरच एकूण उत्पादनक्षमतेत वाढ घडवून आणण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षित आणि पर्यावरणपूरक उपाय देणारी के. बी. बायो ऑर्गेनिक्स ही कंपनी दीर्घकाळापासून शेतकऱ्यांमध्ये विश्वासार्ह नाव म्हणून ओळखली जाते. त्याच परंपरेत ‘मायकोरिस’चे संशोधन कंपनीच्या हाय-टेक प्रयोगशाळेत, अनुभवी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
या मालिकेत ‘मायकोरिस प्रीमियम’ आणि ‘मायकोरिस’ अशा दोन वेगवेगळ्या श्रेणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या गरजा, पिकांची अवस्था आणि जमिनीच्या प्रकारानुसार योग्य पर्याय निवडता यावा, यासाठी या श्रेणी विकसित करण्यात आल्या असून त्या उच्च दर्जाच्या ‘मायकोरायझा’ तंत्रज्ञानावर आधारित आहेत. कंपनीचे मायकोरायझा उत्पादन युनिट पूर्णपणे ROC तंत्रज्ञानावर आधारित असून अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज आहे. या युनिटची दररोज सुमारे ७ हजार बॉटल उत्पादन क्षमता आहे. देशातील मोजक्याच कंपन्यांकडे उपलब्ध असलेली ही एक प्रगत सुविधा मानली जाते.
लोकार्पण कार्यक्रमाला कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संशोधक आणि विविध विभागांतील टीम सदस्य उपस्थित होते.
‘मायकोरिस’ पिकांसाठी तिहेरी कार्यपद्धतीचा लाभ देते. मुळांची मजबूत व खोल वाढ होणे, जमिनीतून पोषक द्रव्यांचे कार्यक्षम शोषण वाढवणे आणि पिकांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती व ताण सहनशीलता वाढविणे या प्रमुख बाबींमुळे रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होते. त्यामुळे ‘मायकोरिस’ विविध पिकांना आधुनिक जैवतंत्रज्ञानाचा आधार देत शाश्वत आणि हरित शेतीकडे जाणारे महत्त्वपूर्ण पाऊल ठरते.
के बी चे ‘मायकोरिस’ आंतरराष्ट्रीय स्तरावर..!
“मायकोरिसचे लोकार्पण हे २०२६ च्या सुरुवातीला नवकल्पना, संशोधन आणि उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम, टिकाऊ आणि निसर्गस्नेही शेतीकडे घेऊन जाणे हेच आमचे ध्येय आहे.” हे उत्पादन लवकरच भारतातील १३ राज्यांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ४ देशांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे.
सचिन यादव,
व्यवस्थापकीय संचालक, के. बी. बायो ऑर्गेनिक्स प्रा.लि.
