दुःखाला पद नसतं… अश्रूंना सत्ता कळत नाही..! ; एक उपमुख्यमंत्री, एक गृहिणी… वेदना मात्र समान..!

फलटण : बारामती येथील भीषण विमान दुर्घटनेने महाराष्ट्राच्या छातीत खोल जखम केली. या दुर्घटनेत महाराष्ट्राचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांचे निष्ठावंत अंगरक्षक विदिप जाधव यांचा अकाली मृत्यू झाला. एका क्षणात दोन संसार उद्ध्वस्त झाले. पद, प्रतिष्ठा, अधिकार या साऱ्यांचा त्या वेदनेपुढे अर्थ उरला नाही.
दादांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. रस्त्यांवरून, घराघरांतून, डोळ्यांतून अश्रू वाहत होते. पण या दुःखाच्या केंद्रस्थानी होत्या त्यांची अर्धांगिनी सुनेत्राताई. पती गमावण्याची वेदना, मनातली पोकळी आणि तरीही राज्याची जबाबदारी… हे ओझं पेलत त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली. आपले दुःख गिळून, दादांची कार्यशैली, वेळेची शिस्त आणि जनतेशी असलेली नाळ त्यांनी जपली. मात्र मनातली वेदना कुठेच थांबत नव्हती. या दुःखातूनच सावरत सुनेत्राताईंनी कराड येथे स्वर्गीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत मौनातूनच आपली वेदना व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी फलटण तालुक्यातील तरडगाव गाठले. दादांसोबत मृत्युमुखी पडलेल्या अंगरक्षक विदिप जाधव यांच्या घरात पाऊल टाकताच वातावरण अधिकच गहिवरले. यावेळी सुनेत्राताई ना उपमुख्यमंत्री होत्या, ना सत्ता होती होत्या त्या फक्त दोघी समदुःखी व वेदनाग्रस्त स्त्रिया. पती गमावलेल्या जाधव यांच्या पत्नीसमोर उभ्या राहिलेल्या सुनेत्राताईंनाही अश्रूंना आवर घालता आला नाही. दोघींच्या नजरा भिडल्या आणि शब्द अपुरे ठरले. त्या क्षणी दुःखाला भाषा उरली नव्हती. फक्त अश्रू होते… नि:शब्द वेदना होत्या.
आपल्या दुःखाला बाजूला सारत सुनेत्राताईंनी जाधव कुटुंबीयांना धीर दिला, त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा शब्द दिला. “तुम्ही एकटे नाही,” हा आधार त्या भेटीतून मिळाला. त्या घरातील प्रत्येक डोळा पाणावलेला होता ; उपस्थितांचे मन सुन्न झाले होते. आपले अश्रू पुसत सुनेत्रावहिनी बारामतीकडे रवाना झाल्या. मात्र त्या काही मिनिटांच्या भेटीने अनेकांच्या मनात माणुसकीचा ठसा उमटवला. सत्ता, पद, अधिकार या साऱ्यांच्या पलीकडे जाऊन दुःखात सहभागी होण्याची भावना या प्रसंगातून ठळकपणे समोर आली.
या दुर्घटनेने महाराष्ट्राने एक नेता गमावला पण या भेटीतून माणुसकीचा, संवेदनशीलतेचा आणि जबाबदारीचा अर्थ अधिक खोलवर उमटून गेला. यानिमित्ताने दुःखाला पद नसत आणि अश्रूंना ओळख नसते ! हे तर प्रकर्षाने जाणवलेच परंतु उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंची अंगरक्षकाच्या पत्नीला भेट हा वेदनेचा नि:शब्द क्षणदेखील या निमित्ताने पहावयास मिळाला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!