श्री संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटी यांचे विविध उपक्रम कौतुकास पात्र : सुंदरगिरी महाराज

फलटण : मानवी जीवनामध्ये वाटचाल करीत असताना संतांचे विचार व त्यांची वचने नेहमीच प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतात. आज प्रत्येक समाजाने संत वाटून घेतले आहेत अशी खंत व्यक्त करतानाच श्री संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटी, फलटण यांच्या माध्यमातून राबविले जात असलेले विविध उपक्रम हे निश्चितपणे कौतुकास पात्र आहेत असे प्रतिपादन सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती महंत सुंदरगिरी महाराज यांनी केले.
श्री संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटी, फलटण यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती सोहळा व श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी गणपतराव भोसले, डॉ. सुभाष जाधव, शशिकांत भोसले, ॲड. प्रतीक देशमाने, श्रीकांत साळुंखे, पत्रकार किरण बोळे, विकास शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मानवी जीवनामध्ये संतांच्या विचारांची गरज आज आपणास पावलोपावली जाणवते. संतांचे कार्य हे कोणा एका समाजाच्या उद्धारासाठी नव्हे तर सकल जगाच्या उद्धारासाठी आहे. साक्षात भगवंतांनीच वेळोवेळी संतांच्या रूपात अवतार घेतले आहेत असे सांगून सुंदरगिरी महाराज म्हणाले, जोवर आपण सद्गुरूंच्या व संतांच्या चरणी लीन होत नाही तोवर आपणास तेज ज्ञान प्राप्त होणार नाही, म्हणूनच संतांचे विचार त्यांची शिकवण व त्यांनी दिलेले ज्ञान आपण सर्वांनी नि:स्सीम व सात्विक बुद्धीने व शुद्ध अंतकरणाने आचरणात आणायला हवेत.

यावेळी महाबळेश्वर येथील सतीश साळुंखे यांना श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला व सदर पुरस्काराचे वितरण महंत सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. शाल, श्रीफळ, गौरवचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
कार्यक्रमात प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर संस्थेचे अध्यक्ष भोलेनाथ भोईटे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मान पत्र देऊन महंत सुंदरगिरी महाराज यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या घटकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक अरुण खरात यांनी सूत्रसंचालन प्रा. विठ्ठल हंकारे यांनी केले. आभार सागर भोईटे यांनी मानले.
कार्यक्रमास माजी नगरसेविका ज्योती खरात, डॉ. रोहिदास साळे, अशोक भगत, नयना भगत, कृष्णात बोबडे, गणेश भोईटे आदीसह चर्मकार समाजबांधव उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!