महानुभाव पंथीयांची घोड्याची यात्रा सुरू ; ७ एप्रिलला यात्रेचा मुख्य दिवस

फलटण : महानुभाव पंथीयांची दक्षीण काशी व श्री चक्रपाणी महाराजांची जन्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र फलटण येथील प्रसिद्ध घोड्याची यात्रा गुरुवार दि. २ एप्रिल पासुन सुरु झाली आहे. यात्रेचा मुख्य दिवस मंगळवार दि. ७ एप्रिल असून यात्रा परंपरागत धार्मिक पद्धतीने साजरी होणार आहे.
ऐतिहासिक व धार्मिक महत्व असलेल्या फलटण शहरात महानुभाव पंथीयांची श्री आबासाहेब, श्री रंगशिला, श्री बाबासाहेब (श्रीकृष्णनाथ), श्री चक्रपाणी (जन्मस्थान),श्री रंगशीळा, श्री दत्त मंदिर (मलठण) अशी सहा प्रमुख मंदिरे आहेत, तसेच महानुभाव पंथीयांची अन्य अनेक छोटी मंदिरे व मठ आहेत. श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टने मंदिराचा जिर्णोध्दार केला असून मुख्य मंदिराच्या जागी अत्यंत उत्तम दगडी बांधकामाचे मंदिर उभारले आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्रासह हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यातून भाविक मोठ्या संख्येने यात्रेसाठी दाखल होत असतात. यात्रेसाठी आलेले सर्व भाविक भक्त फलटण येथील विविध मंदिरे व त्या परिसरातील महानुभाव आश्रमांमध्ये राहतात. यात्रेनिमित्त सर्व मंदिरांची स्वच्छता व रंगरंगोटी पूर्ण करण्यात आली असून यात्रे दरम्यान नगर परिषद स्वच्छता, आरोग्य, पाणी वगैरे सर्व सोयी सुविधा उपलब्ध करत असते.
यात्रेच्या पहिल्या दिवसापासून दररोज सायंकाळी ७ वाजता छबीना काढण्यात येतो. शहराच्या पश्‍चिमेकडील भागात, बाणगंगा नदीकाठी असलेल्या पुरातन श्री बाबासाहेब मंदिरापासून छबीन्याला सुरुवात होते. छबीन्यामध्ये भाविक मानकरी आपल्या खांद्यावर पितळी घोडे घेवून सहभागी होतात. या छबिन्यामध्ये मोठ मोठे ढोल वाद्याच्या स्वरुपात वाजविण्यात येतात. या छबिन्यात भाविक स्त्री/पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होतात. बाबासाहेब मंदिर, सुभाष चौक, चावडी चौक, बारस्कर चौक, मारवाड पेठ या मार्गाने छबीना रात्री साडेनऊ पर्यंत आबासाहेब मंदिरात पोहोचतो तेथे गेल्यानंतर आरती होवून छबीना समाप्त होतो. यंदा दि. २ ते ६ एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी सात वाजता छबिना निघणार आहे. यावर्षी मंगळवार दि. ७ एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस असून सकाळी दहा वाजता मानकरी श्रीकृष्ण मंदिर (बाबासाहेब मंदिर) फलटण येथून मानाचा घोडा वाजत गाजत डोक्यावर घेवून बाणगंगा नदीपात्रात त्याला दही, दूध वगैरे पंचामृताने स्नान घालुन पुष्पहार, दवना डोक्यावर लावून श्रीकृष्ण मंदिरात भाविकांना दर्शनासाठी ठेवला जातो. त्यादिवशी दुपारी आबासाहेब मंदिरातील आरती संपल्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्रीकृष्ण भगवंताची मूर्ती पालखीत विराजमान करण्यात येणार असून त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन होणार आहे. त्यानंतर मानकर्‍यांच्या हस्ते पूजन होवून पालखी मिरवणूकीस सुरुवात होणार आहेे.
या मिरवणूकीत मानकर्‍यांच्या खांद्यावर पितळी घोडे त्या पाठिमागे पालखी व अन्य मानकरी असतात हा सोहळा आबासाहेब मंदिरापासून दगडी पूल मार्गे श्रीकृष्ण मंदिरात (बाबासाहेब मंदिर) पोहोचतो. तेथून चावडी चौक, बारस्कर चौक, महादेव मंदिर मर्गे बाणगंगा नदीतून पितळी घोडे पाणी पिण्यासाठी मानकरी नदीपर्यंत पळत घेवून जातात या पध्दतीने बाणगंगा नदीतून बारवबाग, मलठण, दत्त मंदिर, शुक्रवार पेठेतून पालखी श्रीकृष्ण मंदिर (बाबासाहेब मंदीर) आणि पुन्हा आबासाहेब मंदिरात पोहोचल्यानंतर पालखी सोहळा समाप्त होतो. यात्रेनिमित्त सर्व मंदिरांमध्ये विविध धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!