फलटणमध्ये महावीर जयंती विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरी

फलटण : भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त फलटण शहरातील सकल जैन समाजाच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे भगवान महावीरांची पालखी, चांदीचा रथ व चित्र रथासह शहरातील प्रमुख मार्गावरुन भव्य शोभा यात्रा, भगवान महावीर स्तंभ येथे मान्यवरांच्या हस्ते भगवान महावीरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन तसेच रक्तदान शिबीर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाच्या निमित्ताने भगवान महावीर स्तंभ परिसरात उत्तम सुशोभीकरण करण्यात आले होते. आमदार सचिन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांनी भगवान महावीर यांना अभिवादन केले.
सकाळी ६ वाजता आदिनाथ मंदिर येथे भगवंतांचा अभिषेक झाल्यानंतर आदिनाथ मंदिर व पार्श्वनाथ मंदिर, शुक्रवार पेठ येथून सुरु झालेल्या शोभायात्रेत अग्रभागी पालखी त्यामध्ये भगवान महावीर यांची प्रतिमा, त्यामागे चांदीचा रथ तर त्या पाठीमागे ३ चित्र रथ होते. शोभा यात्रेसमोर समाजातील युवक, युवतींचे चक्रवर्ती ढोलताशा पथक व अन्य मंगल वाद्य होती. शहरातील आदिनाथ मंदिर – शुक्रवार चौक – शंकर मार्केट – छ. शिवाजी वाचनालय – पाचबत्ती चौक – बारामती चौक – छ. शिवाजी महाराज चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या प्रमुख मार्गाने शोभायात्रा भगवान महावीरांच्या जयघोषात नगरपालिके नजिक महावीर स्तंभ येथे पोहोचल्यावर मान्यवरांच्या व आजी, माजी नगरसेवक यांच्या हस्ते भगवान महावीरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शोभा यात्रा शहरातील डेक्कन चौक, म. फुले चौक, भगवान चंद्रप्रभू मंदिर मारवाड पेठ, बारस्कर चौक या प्रमुख मार्गाने आदिनाथ मंदिर येथे पोहोचल्यावर विसर्जित करण्यात आली.

श्रीराम मंदिर नजीक टोपी चौक येथे शोभा यात्रेतील श्रावक श्राविकांना जैन सोशल ग्रुपच्या वतीने पाणी बॉटल वाटप करण्यात आले. राहुल ट्रेडींग कंपनी यांच्या वतीने सिमेंट रोड येथे तर छ.शिवाजी महाराज चौक येथे अजित पाईपस् तर्फे शोभायात्रेत सहभागी झालेल्या श्रावक/श्राविकांसाठी सरबताची व्यवस्था करण्यात आली होती. शोभायात्रा समाप्ती नंतर प्रितम जयकुमार गांधी (खुंटेकर) यांच्यावतीने सकल जैन समाजासाठी श्री १००८ सहस्त्रकुट दिगंबर जैन धर्मशाळा येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
मिरवणुकीनंतर जैन सोशल ग्रुप फलटण व फलटण मेडिकल फौंडेशन ब्लड बँक,फलटण यांच्या संयुक्त सहभागाने आयोजित रक्तदान शिबिरात ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच जैन सोशल ग्रुपच्या वतीने दुपारी गो शाळेत चारा वाटप व अनाथाश्रमात धान्य वाटप करण्यात आले व सायंकाळी ५ वाजता शहरातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली. भगवान महावीर जन्मकल्याणक कार्यक्रमाचे आदिनाथ युवक कमिटी, अहिंसा युवक कमीटी, चंद्रप्रभू युवक कमिटी, श्री सन्मती सेवा दल, फलटण यांनी उत्तम नियोजन केले होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!