अविद्येच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशात


महात्मा ज्योतिराव फुले
तुम्ही फक्त फुलांचा व्यापार केला असता
तर या देशातल्या कळ्या
उमलण्याआधीच खुडल्या गेल्या असत्या…..
पण तुम्ही व्यापार नाही केला,
तुम्ही क्रांती केली.
ज्ञानाची, समतेची,
आणि मानवतेची.
अंधाराच्या हजारो वर्षांच्या काळ भिंतींवर
तुम्ही पहिलं अक्षर लिहिलं,
आणि त्या अक्षराला
सावित्रीमाईंचा हात मिळाला…
पुण्याच्या भिडे वाड्यामध्ये
जेव्हा पहिली शाळा उभी राहिली,
तेव्हा फक्त भिंत आणि फळा नव्हता,
तो होता इतिहासाचा पहिला सूर्योदय.
कुंकवाच्या लाल रेषेतून
जेव्हा अक्षर उमटलं,
तेव्हा हजारो वर्षांचा अंधार
क्षणात मागे सरकला.
लोक म्हणत होते-
“स्त्री शिकली तर धर्म बुडेल!”
पण तुम्ही विचारलंत –
धर्म बुडतो की अज्ञान?
आणि त्या प्रश्नाने
खोट्या परंपरांचे किल्ले
थरथर कापू लागले.
तुम्ही दलितांसाठी पाण्याचा हौद उघडला,
आणि मानवतेला
पहिल्यांदा पाणी मिळालं.
तुम्ही ‘शेतकऱ्यांचा आसूड’ लिहिला,
आणि शेतकऱ्यांच्या घामाला
पहिल्यांदा आवाज मिळाला.
तोच पेहराव,
तोच मातीचा सुगंध,
तोच शेतकऱ्यांचा स्वाभिमान…
आजही तुमच्याच नावाने जिवंत आहे.

रायगडाच्या शांत दगडांमध्ये
जेव्हा तुम्ही इतिहास शोधला,
तेव्हा पुन्हा उजळला
शिवरायांचा तेजस्वी वारसा.
तुम्ही पहिल्यांदा
शिवजयंतीचा दीप पेटवला,
आणि लोकांना दाखवलं
स्वराज्य म्हणजे स्वाभिमान.

तुम्ही धर्माची चिकित्सा केली,
आणि सत्याचा मार्ग उघडला.
त्या मार्गाचं नाव पडलं
सार्वजनिक सत्यधर्म.
जिथे जाती नव्हती,
जिथे भेदभाव नव्हता,
जिथे फक्त माणूस होता.
ब्राह्मण्यवादी विषमतेच्या
प्रत्येक साखळीवर
तुम्ही प्रश्नांचा हातोडा मारला,
आणि जनमानसात
समतेची बीजं पेरली.

काळ पुढे गेला…
पण तुमच्या विचारांचा दिवा
कधीच विझला नाही.
एक दिवस
घटनेचा शिल्पकार
तुमच्या विचारांसमोर उभा राहिला,
त्याने तुम्हाला
ज्ञानाचा मार्गदर्शक मानलं
आणि समतेचा तोच दीप
भारतीय राज्यघटनेत पेटवला.
आज या देशात
महिला पंतप्रधान होतात,
राष्ट्रपती होतात,
गावपातळीवर नेत्या ही होत आहेत.
याच एकमेव कारण सावित्रीमाई फुले
तिनंच तर मुलीच्या हातात
पुस्तक दिलं होतं.
आज प्रत्येक शिक्षित स्त्री
तुमचीच लेक आहे,
प्रत्येक शाळा
तुमच्या स्वप्नाचीच पाऊलवाट आहे,
प्रत्येक पुस्तकात
तुमचं बीज आहे.

जोतिबा,
तुम्ही फक्त फुले विकली नाहीत,
तुम्ही माणसांना फुलवलं.
तुम्ही फक्त शाळा उघडली नाही,
तुम्ही भविष्य उघडलं.
आणि म्हणूनच
इतिहास तुमचं नाव घेताना
नतमस्तक होतो.
कारण तुम्ही
फक्त समाजसुधारक नाही –
तुम्ही
मानवतेच्या क्रांतीचे
खरे महात्मा आहात.


आजची स्त्री
आकाशाला स्पर्श करते,
विद्येच्या शिखरावर उभी राहते,
कार्यालयात, संसदेत, न्यायालयात
तिचा आवाज घुमतो.
पण कधी कधी
एक विदारक चित्र दिसतं…
हातात पुस्तकाऐवजी
पोथी-पुराणाचे ओझे,
डोक्यावर विचाराऐवजी
अंधपरंपरेची सावली.
हे पाहिलं की
इतिहास हळहळतो…
कारण कधीकाळी
त्यांच्याचसाठी दगड सहन केले होते
सावित्रीबाई फुले यांनी.
तुमच्या हातात पुस्तक यावं म्हणून
अवहेलना सहन केली होती
महात्मा ज्योतिराव फुले यांनी.
ज्या अक्षरासाठी
त्यांनी आयुष्य जाळलं,
ते अक्षर
आज पुन्हा अंधारात हरवतंय का?
ज्या स्त्रीला त्यांनी
ज्ञानाचा दिवा दिला,
तीच स्त्री
परंपरेच्या नावाखाली
पुन्हा गुलामीकडे चालली आहे का?
इतिहास पुन्हा विचारतो-
हे सावित्रीच्या लेकरांनो,
तुम्ही विसरलात का
तो दगडांचा रस्ता?


इतिहासाच्या पानांवरून
एक आवाज उठतो आहे…
त्या क्रांतीचं नाव
महात्मा ज्योतिराव फुले.
माणसाला माणूस म्हणण्याआधी
जात विचारली जायची…
पण एका प्रश्नाने
सगळं हलवलं –
“जर पृथ्वी सगळ्यांची आहे
तर माणूस वेगळा कसा?”


अज्ञान अंधाराच्या त्या काळात
समाज साखळ्यांनी जखडला होता…
केशवपनासारख्या क्रूर प्रथेविरुद्ध
तुम्ही आवाज उठवला.
नाभिकांचा संप घडवून आणला,
तो फक्त संप नव्हता,
तो होता मानवतेचा आवाज.

बालहत्या प्रतिबंधक गृह उघडलं,
जिथे
मृत्यूऐवजी आयुष्य मिळालं,
भीतीऐवजी माया मिळाली.
आज आईच्या सहीत
जेव्हा अक्षर उमटतं,
तेव्हा इतिहास बोलतो…
आज बायकोच्या सहीने
जेव्हा धनादेश वटतो,
तो व्यवहार नसतो
तो असतो स्वाभिमानाचा विजयघोष.
आणि त्या क्षणी
सावित्रीबाई फुले
अभिमानाने हसतात…
दोन हजार वर्षांच्या अज्ञानाला
एका जोतिबांच्या ज्ञानाने
प्रकाश दिला –
हे सूर्यही नाकारू शकत नाही!

– सतीश मनीषा

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!