‘श्रीमंत’ श्रीराम तुम्ही चालवा व तालुक्याला ‘कर्तृत्व’ दाखवा : रणजितसिंह यांचे आव्हान

फलटण : श्रीराम सहकारी साखर कारखाना हा तालुक्याचा स्वाभिमान आहे. फलटण दूध संघाप्रमाणे श्रीराम कारखाना देखील विकायला काढायचा असा सत्ताधाऱ्यांचा डाव समोर आल्यानेच त्यांनी आणलेल्या तथाकथित प्रायव्हेट कंपनीला आमचा विरोध आहे. कायद्याची कवचकुंडले वापरून प्रशासक हटवून श्रीराम पुन्हा ताब्यात घेतला असल्याने आता ‘श्रीमंतांनी’ हा कारखाना स्वतःच्या ‘कर्तृत्वावर’ चालवून दाखवावा असे आव्हान करून जवाहरला घालवून स्वतःच्या मर्जीतला मालक आणण्यामागचा ‘गुरु’ व भांडवलदार कोण आहे हे तालुक्याला माहिती असल्याची खरमरीत टीका भाजपचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.
श्रीराम कारखान्याबाबत फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, ऍड. नरसिंह निकम, विक्रम भोसले, भीमदेव बुरुंगले आदी मान्यवरांची उपस्थिती.
श्रीरामचे अस्तित्व हे सहकारी तत्त्वावरतीच राहायला हवे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. महाराष्ट्रात अनेकांनी अडचणीतले कारखाने यशस्वीपणे चालवून दाखवले आहेत, पण यांना मात्र कारखाना चालवायला जमत नाही. जर हा कारखाना खाजगी अथवा भागीदारी तत्त्वावर चालवायला दिला तर संचालक व सदस्य यांना काय अधिकार राहणार आहेत असा सवाल व्यक्त करून रणजितसिंह म्हणाले, श्रीराम खाजगी तत्त्वावर चालविण्यास देण्यात येऊ नये अशी विनंती आम्ही राज्य शासनाकडे केली होती त्यानुसार अधिकार नसताना खाजगी कारखान्यास हा कारखाना चालविण्यास देऊ नये असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. कारखाना चालविण्यास देण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार मुदत संपलेल्या संचालक मंडळाला नाही परंतु तरीदेखील अनेक सभासदांचा खाजगीकरणाच्या ठरावाला असणारा विरोध डावलून सहकारी तत्त्वावरचा हा कारखाना खाजगी कंपनीला देण्याचा घाट घातला जात आहे. ज्या पद्धतीने पूर्वी कारखान्याची शहरात मध्यवर्ती भागात असणारी २१ एकर जमीन कवडीमोल भावाने विकली, त्याच प्रकारे आगामी काळात श्रीराम कारखाना खाजगी कंपनीला विकायचा डाव सत्ताधाऱ्यांचा असल्याचा आरोप करून तालुक्यातील सर्व सत्ता केंद्र ताब्यात असताना देखील तो तुम्हाला दुसऱ्याला चालवण्यास का द्यावा लागला असा प्रश्न उपस्थित केला. जेव्हा श्रीराम ताब्यात घेतला त्यावेळी कारखान्याचे पुनर्जीवन करणार, त्याला गतवैभव प्राप्त करून देणार, सोन्याचे दिवस आणणार असे म्हणून तुम्ही निवडून आला होता, परंतु गेल्या वीस ते पंचवीस वर्षात तसे काही घडल्याचे दिसून आले नाही, त्यामुळे आगामी काळात जेव्हा कारखान्याची निवडणूक होईल त्यावेळी तुम्ही कोणत्या अधिकाराने सभासदांसमोर मते मागायला जाणार आहात, तेव्हा तुम्हाला काढता पायच घ्यावा लागणार आहे व सभासद हा कारखाना कुठल्या संचालकांकडे द्यायचा याचा योग्य तो निर्णय घेतील असा विश्वासही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी ऍड. नरसिंह निकम व विश्वासराव भोसले यांनी श्रीराममध्ये कसा भ्रष्टाचार झाला याबाबतची सविस्तर माहिती दिली.
ती आमची भूमिका नाही : शिवरूपराजे
श्रीराम कारखाना बंद पडावा अशी आमची अजिबात भूमिका नाही आणि आम्ही कोणत्याही पद्धतीचा स्टे आणलेला नाही. चालू कारभाराबाबत आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही, आमचा विरोध फक्त आणि फक्त खाजगीकरणाला आहे. सर्व हिशोब पूर्ण करून त्यांनी जवाहर कारखान्याला सोडायला हवे होते. श्रीराम कारखाना सहकारी तत्त्वावर चालवण्यासाठी आम्ही त्यांना संपूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. कारखान्याचे सहकारपण टिकवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही त्यांच्यासोबत कुठेही एका सतरंजीवर एकत्र बसायला तयार आहोत, गरज पडल्यास त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचीही आमची तयारी आहे अशी भूमिका यावेळी शिवरूपराजे खर्डेकर यांनी स्पष्ट केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!