
फलटण : शिक्षणाच्या बळावर आयुष्याला नवी दिशा देत समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणाऱ्या गिरवी येथील विद्या सुरजकुमार निकाळजे यांनी एलएलबी परीक्षा उज्ज्वल यशाने उत्तीर्ण होत गिरवी पंचक्रोशीतील अनुसूचित जातीतील बौद्ध समाजाच्या पहिल्या महिला वकील बनण्याचा मान मिळवला आहे.
विद्या निकाळजे यांनी बारामती येथील वसंतराव पवार विधी महाविद्यालयातून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. कठोर परिश्रम, जिद्द व चिकाटी आणि शिक्षणावरील निष्ठेच्या बळावर त्यांनी हे यश संपादन करत ग्रामीण भागातील मुलींसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. वकिलीचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी समाजकार्याची वाटही तितक्याच निष्ठेने चालू ठेवली. साप्ताहिक ‘अष्टभुजा हिरकणी’च्या कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी प्रभावी जबाबदारी सांभाळत महाराष्ट्रातील शेकडो महिलांचे संघटन केले. महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रेरणा देणे, सामाजिक प्रश्नांवर जागृती करणे आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे, हे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.
माण-खटाव तालुक्यातील विविध सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. हरित वसुंधरा अभियानात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून पर्यावरण संवर्धनासाठी मोलाचे योगदान दिले आहे. तसेच बार्टीच्या माध्यमातून आयोजित पोलीस पाटील प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी विशेषतः महिला पोलीस पाटील यांना मार्गदर्शन व प्रेरणा देण्याचे कार्य केले.
विद्या निकाळजे यांचे हे यश केवळ त्यांच्या कुटुंबाचा नव्हे, तर संपूर्ण गिरवी पंचक्रोशीचा अभिमान आहे. त्यांचा संघर्ष, शिक्षणावरील विश्वास आणि समाजसेवेची तळमळ अनेक तरुणींसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. “शिक्षण हेच परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे,” हा संदेश त्यांच्या यशातून अधोरेखित होत असून त्यांच्या भावी वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

