
फलटण : शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत फलटणमधील एका २५ वर्षीय तरुण व्यापाऱ्याची तब्बल ४२ लाख रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू आहे. अर्थ मनीष गांधी वय २५, व्यवसाय ज्वेलर्स शॉपी, रा. रविवार पेठ, फलटण असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबत फलटण शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गांधी याच्याशी आरोपींनी फोन व व्हाट्सअपच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांनी शेअर मार्केट ट्रेडिंगचा अनुभव असल्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर एमटीएफ व शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवत गांधी यास विविध ट्रेडिंग अकाऊंट व बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. आरोपींच्या सांगण्यावरून त्यांनी विविध बँक खाती व यूपीआयद्वारे एकूण ४२ लाख रुपये जमा केले. ट्रेडिंग अकाऊंटमध्ये नफा झाल्याचा आभास निर्माण करून त्यांना आणखी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. मात्र, गुंतवलेली रक्कम परत मागितल्यानंतर आरोपींनी विविध कारणे सांगत टाळाटाळ केली. तसेच ‘मार्जिन’ आणि ‘ट्रेडिंग पोझिशन रिलीज’ करण्याच्या नावाखाली आणखी पैशांची मागणी केली. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे गांधी याच्या लक्षात आले. यावरून त्यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात सदर आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीनुसार आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२), ३३६(३), ३४०(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ४३(अ), ४३(ब), ६६(ब) आणि ६६(ड) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक घन:श्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींनी वापरलेले मोबाईल क्रमांक, बँक खाती, यूपीआय व्यवहार तसेच आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली जात आहे.
दरम्यान, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून शेअर मार्केट ट्रेडिंग, मोठ्या नफ्याचे आमिष दाखविणाऱ्या ऑनलाईन गुंतवणूक योजनांपासून सावध राहावे. कोणालाही ओटीपी, पिन, पासवर्ड, आधार, पॅन किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती देऊ नये. ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधून जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

