
फलटण : आयडियल इंटरनॅशनल स्कूल ॲन्ड ज्युनियर कॉलेज, फलटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दोन दिवसीय वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात विमानतळ येथे पार पडला. प्ले ग्रूपपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वयोगटानुसार विविध स्पर्धांचे नियोजन करण्यात आले होते.
संचालक शिवराज भोईटे यांच्या हस्ते या महोत्सवास प्रारंभ करण्यात आला. सुरुवातीस राष्ट्रगीत, प्रतिज्ञा झाल्यानंतर पारंपरिक मशाल फेरी काढण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेली शिस्तबद्ध परेड विशेष आकर्षण ठरली. क्रीडा महोत्सवात प्ले ग्रूपपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वयोगटानुसार विविध स्पर्धांचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये पहिल्या दिवशी रनिंग रेस, कोन रेस, डंबेल रेस, रिंग रेस, बुक बॅलन्सिंग, सॅक रेस, टग ऑफ वॉर, शॉटपुट अशा वैयक्तिक कौशल्यवर्धक स्पर्धा झाल्या. दुसऱ्या दिवशी हाऊसवाइज सेवन स्टोन, फुटबॉल, क्रिकेट, रिले यांसारख्या टीम स्पर्धांनी वातावरण अधिक रंगतदार झाले. मैदानावर सादर झालेल्या प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्साह, आत्मविश्वास आणि निरोगी स्पर्धात्मकता जाणवत होती. स्पर्धेनंतर विजेत्यांचा सन्मान मैदानावरील विशेष मंचावर संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ. वैशाली शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीनुसार सर्टिफिकेट, मेडल्स आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. यावेळी शाळेचे संचालक शिवराज भोईटे, केंद्र प्रमुख सुचिता जाधव, निखिल कुदळे, प्रवीण पवार आदींची उपस्थिती होती. स्पर्धे दरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीला भरभरून दाद दिली.
गोल्डन ड्रीमस् एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. सौ. वैशाली शिंदे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली दोन दिवसांच्या या क्रीडा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये जोश, शिस्त आणि क्रीडाभाव निर्माण झाला. शिक्षकांच्या एकसंध नियोजणामुळे हा क्रीडा महोत्सव शिस्तबद्धपणे आणि यशस्वीरित्या पार पडला.
स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघटितपणा, नेतृत्व गुण, क्रीडाभाव, आत्मविश्वास, सहकार्य आणि लक्ष केंद्रीकरण विकसित करतात. ताणतणाव व्यवस्थापन, निर्णयक्षमता आणि सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी खेळ हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा अशा उपक्रमांना विशेष महत्त्व देत असल्याचे संस्था प्रमुख डॉ. वैशाली शिंदे यांनी यावेळी सांगितले.
