
फलटण : महाराष्ट्राला एका वर्षात ३० लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले असून, हा देशातील आतापर्यंतचा उच्चांक आहे. घरांसाठी आज आपल्याला ९ हजार कोटी मिळाले आहेत. ३० लाख घरांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत आपण अत्यंत गतीने काम करत पाच लाख बेघर लोकांना घरांच्या चाव्या सुपुर्त करत आहोत. पुढील वर्षी १५ लाख लोकांना चाव्या सुपुर्त करु. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांना पक्की घरे’ या स्वप्नाच्या पुर्तीसाठी अहोरात्र काम करुन येत्या पाच वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला पक्के घर देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी ३० लाख घरे मंजूर केली आहेत. त्यातील पाच लाख घरे पूर्ण झाली असून याचा लोकार्पण सोहळा व महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम शुक्रवार दि. १५ रोजी सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर पार पडला. या प्रसंगी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार महेश शिंदे, अतुल भोसले, मनोज घारेपडे, सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी आमदार मदन भोसले, दिलीप येळगावक, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे सह सचिव अमित शुक्ला, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, गृह मंत्रालय नवी दिल्लीच्या राज भाषा विभागाच्या सहसचिव डॉ. निधी पांडे, संचालक ग्रामीण गृह निर्माण ग्रामीण विकास मंत्रालय शक्तीकांत सिंग, संचालक डॉ. राजाराम दिघे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपसंचालक राजलक्ष्मी येरपुडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गत दहा वर्षात महाराष्ट्राला १३ लाख घरे मिळाली. परंतु गेल्या वर्षी केंद्र शासनाने राज्यासाठी ३० लाख घरांचे उद्दिष्ट दिले. यामुळे सव्वा कोटी लोकांना त्यांच्या डोक्यावर पक्के छत मिळणार आहे. २०४७ पर्यंत भारताला विकासीत राष्ट्र बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. प्रत्येकाला हक्काचे घर हा या स्वप्नाचा पाया आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घर मिळणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला कायमपणे मोफत वीज देण्यासाठी सौर ऊर्जेसाठी अनुदान देण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांना स्वत:ची जागा नाही त्यांना घर बांधण्यासाठी जागा विकत घेण्यासाठी शासन एक लाख रुपयांचे अनुदान देत आहे. अनेक शासकीय जागांवरील आरक्षणे रद्द करुन बेघरांना घरासाठी जागा उपलब्ध करुन दिल्या आहेत. केंद्र शासन देत असलेल्या अनुदानामध्ये आणखी ५० हजारांची भर राज्य शासनाने घातली आहे. ज्या बेघारांचा यादीमध्ये समावेश नाही त्यांना सामावून घेण्यासाठी पोर्टल पुन्हा उघडले आहे, त्यामुळे त्यांना घर देण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
शेतकऱ्यांच्या विविध विषयांबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ३० जून पुर्वी शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यात येईल. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानही देण्यात येईल. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असल्याने केंद्रीय कृषी मंत्री यांना विनंती केल्यानुसार त्यांनी आजपासूनच १२.३५ पैसे दराने कांदा खरेदी सुरु केली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. येणाऱ्या आठवड्यात दिल्लीत केंद्रीय गृह मंत्री यांची वेळ घेऊन साखर कारखादारी आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावरील संकट दूर करण्यासाठी बैठक घेण्यात येईल व साखरेच्या किमान विक्री दराबाबत केंद्राकडे पाठपुरावा करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येतील असे सांगून ते म्हणाले, महाराष्ट्रात दोन वर्षात ५० लाख लाडक्या बहिणी लखपती केल्या आहेत. आता १ कोटी बहिणींना लखपती करण्याचे उद्दिष्ट असून त्याद्वारे अर्थव्यवस्था संचलित होईल आणि देशाची अर्थ व्यवस्था पाच ट्रीलियन करण्यामध्ये निश्चितपणे मदत मिळेल. ग्रामीण रस्त्यांसाठी केंद्र शासनाने १२३ कोटीचा निधी उपलब्ध करुन दिल्याचे सांगून देश संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानाला साथ देऊया, परकीय चलन वाचविण्यासाठी सोन्याची खरदी, परदेशी दौरे टाळूया. इंधनाचा वापर कमी करुया, असेही आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री चौहान म्हणाले, भारतातील एकही गरीब कच्च्या घरात राहणार नाही. सर्वांसाठी पक्की घरे हा पंतप्रधान मोदींचा संकल्प आहे. त्यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्राला एक वर्षात ३० लाख घरांचे उद्दिष्ट दिले. देशातील कोणत्याही राज्याला इतके उद्दिष्ट दिले गेले नाही. देशात ३ कोटी दिदी लखपती झाल्या आहेत. आत्ता ६ कोटी लखपती दिदींचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रात १ कोटी लखपती दिदी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगून १ जुलै पासून ग्रामीण भागाच्या विकासासाठी विकसीत भारत जी रामजी योजना सुरु होत आहे. यातून ग्रामीण भागाचा कायापालट होईल. गावच्या विकासाचा आराखडा गावातच बनविला जाईल, ग्रामीण भागाच्या विकासाचा वेग वाढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देशाचा पैसा व वेळ वाचविण्यासाठी एक देश एक निवडणूक या तत्वानुसार सर्व राज्यांच्या विधानसभेच्या आणि लोकसभेची निवडणूक एकाच वेळी घेण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला सर्वांनी पाठींबा द्यावा. संकटाच्या वेळेत देश म्हणून सर्वांनी एकत्र उभे रहावे, वेळोवेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असेही आवाहन चौहान यांनी यावेळी केले.

महत्वाचे मुद्दे 👉
▪️कार्यक्रमामध्ये पाच लाख घरकुलांचे लोकार्पण केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. ८ हजार ३६८ कोटी रुपयांच्या निधी उपलब्धतेचा आदेश केंद्रीय मंत्री चौहान यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रदान केला.
▪️कार्यक्रमामध्ये महाआवास अभियान २०२३-२४ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींच्या गटात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये ग्रामपंचायत मन्नेवाडी, ता. पाटण आणि ग्रामपंचायत लिंब, ता. सातारा यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी हजारोंच्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.
